Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

म्हणून काय जगायचे सोडून द्यायचे का?

म्हणून काय जगायचे सोडून द्यायचे का?

सोशल मीडिया सध्याच्या घडीला मानव जातीला एका बाजूने सर्व क्षेत्रांतील माहितीपूर्ण माहिती पुरवून सुज्ञ करण्याचे काम करत आहे, त्याच प्रमाणे दुसऱ्या बाजूला जीवनविषयक अर्थहीन ज्ञान पाझरून वर्तमान तसेच भावी तरुण पिढीचे अतोनात नुकसान करत आहे. नमूद विषयाला आधारित अनेक संदेश सोशल मीडिया वर घोंघाळत असतात, त्यातीलच काही आक्षेपार्ह संदेशांविषयी माझे वैयक्तिक मत आजच्या लेखात मांडणार आहे. हा अत्यंत संवेदनशील तसेच वादग्रस्त विषय ठरावा, परंतु विषयावर मत मांडणे गरजेचे वाटले कारण या संदेशरूपी अपुऱ्या ज्ञानामुळे अनेकांचे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची भीती वाटते.

विषयाच्या विश्लेषणात जाण्याआधी एक स्पष्ट करू इच्छितो कि आपण सर्वांनी लक्षात ठेवावे कि आपण म्हणजेच आपले शरीर हे नश्वर आहे तसेच वर्तमान स्थिती जरी आपल्या हातात असली तरी भविष्यकाळ सुखदायी करण्यासाठी वर्तमानातच प्रयत्न व्हावे लागतात, त्यामुळे वर्तमान सुख उपभोगण्याबरोबरच भविष्यासाठी कष्ट देखील करणे आवश्यक असते.    

सोशल मीडियावर सध्या पुढील आशयाचे संदेश सर्रासपणे पसरवले जात आहेत, ज्याने विषयांत लिहिल्याप्रमाणे मनात विचार येतो  – १.  गडगंज संपत्तीचा मालक असलेल्या प्रसिद्ध वृद्ध व्यक्तीचा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील फोटो अथवा व्हिडीओ सोबत एक व्यर्थ संदेश – इतकी संपत्ती कमावून काय फायदा जर आपल्या विषयीचे निर्णय इतर जण घेत असतील. २. कोणा एका व्यक्तीचा मृत्यूनंतर स्मशानातील अंतिम विधी सुरु असतांनाचा फोटो, सोबत लिहिणे कि जीवनात पैशामागे धावत राहिला, पैसे कमावले पण जग सोडून जाताना सोबत एकही पैसे घेऊन जाऊ शकला नाही. ३. एक द्विभाजित फोटो ज्याच्या एका बाजूला आधीचा तंदुरुस्त व्यक्तिमत्व असलेला फोटो, तर दुसऱ्या बाजूला आजाराने ग्रस्त असलेला फोटो, व संदेश असा कि – हे मानवा तू कोणत्या गोष्टीचे घमेंड करत आहेस जिथे नशीब व परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. असे निरुत्साही तसेच निराशाजनक जीवन संदेश पसरवून अशा लोकांना काय साध्य करायचे असते देवाला माहित, आणि बरीच मंडळी हे संदेश पुढे पाठवून अकलेचे तारे तोडत असतात.

विषयाकडे वळता एवढेच ठळकपणे सांगेन कि असे संदेश बनवणारे व ते विनाकारण पसरवणाऱ्यांनी जीवनांत आतापर्यंत काहीच साध्य केले नसते, तसेच जीवनाचे ध्येय स्पष्ट नसते. परिणामी “जसा राजा तथा प्रजा” अशा विचाराने ते असे संदेश पसरवून इतरांची देखील दिशाभूल करतात. मनुष्य जीवन हे एकदाच अनुभवता येते, याचा अर्थ फक्त जे काही आपल्याला मिळाले आहे त्यात समाधानी राहून फक्त आनंद उपभोगणे नाही, तर मनुष्य जीवन मिळाल्याच्या या मौल्यवान देणगीचा आदर करून आपल्या या छोट्याश्या जीवनकाळात अंगीकृत असलेल्या तसेच सुप्त गुणांना वाव देऊन काही मोठे बनण्याची वा करण्याची महत्वाकांक्षा बाळगणे  तथा त्यात यशस्वी होणे हे देखील आहे. याव्यतिरिक्त देखील बऱ्याच काही गोष्टी करण्याजोग्या असतात तसेच यश आले म्हणजे पाठोपाठ संपत्ती देखील आलीच.  

सोशल मीडिया चा वापर हा निराशाजनक संदेश पसरवण्यासाठी न करता उपलब्ध असलेल्या माहिती आधारे स्वतःची तसेच समाजाचा विकास करण्यासाठी झाला पाहिजे, अथवा न केलेलाच बरा. आधीच नमूद केल्याप्रमाणे मनुष्य शरीर हे नश्वर आहे, त्यामुळे हे शरीर सुदृढ असे पर्यंत आपल्या हातून जे काही सत्कार्य करता येईल तेवढे करा, मग ते स्वतःसाठी असो वा इतरांसाठी. भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न असावा परंतु भविष्यात येणाऱ्या शारीरिक व्याधींचा तथा अटळ मृत्यूच्या भीतीने जीवन जगायचे सोडू नका. या जगात फक्त प्लास्टिकच अमर आहे, हे वाक्य मस्करीचे वाटत असले तरी बऱ्याच प्रमाणात वास्तविक आहे, परंतु या जगात आपल्यानंतरही जर काही राहत असेल तर ते आहे आपले नाव, जे आपल्या कर्तृत्व व निस्वार्थ कार्यातून घडते.           

 मनुष्य जीवन हे अनमोल आहे, आणि ते आपल्याला मिळाले याचा अभिमान बाळगा. एकदाच मिळालेल्या या संधीचे सोने करा एवढेच या लेखाच्या माध्यमातून सांगावेसे वाटते. सोशल मीडिया व त्यावरील प्रत्येक माहिती खोटी नसते, परंतु उपलब्ध माहितीची तथ्यता व अनुकूलता पडताळून शक्य असल्यासच उपयोगात आणावी.

गंमतीचा भाग म्हणजे माझा लेख हा देखील सोशल मीडियाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, तरी आपण हा लेख वाचून त्यातील आशय समजून मगच प्रतिक्रिया कळवा, हि विनंती.

हा लेख जर खरंच मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा हि विनंती.

धन्यवाद.

2 thoughts on “म्हणून काय जगायचे सोडून द्यायचे का?

  1. विनोद जी, अत्यंत उत्कृष्ट आणि वास्तवाशी निगडीत अशी सुंदर मांडणी केली आहे. आपल्या या साचेबंद लिखाणामुळे विषय अधिक प्रभावीपणे समोर आणण्याचा आपला प्रयत्न आहे . असेच नवनवीन विषय आणि विचार आमच्यापर्यंत पोहोचवत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *