Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

श्रद्धे आडून भावनेची चेष्ठा

श्रद्धे आडून भावनेची चेष्ठा

नमस्कार मित्रांनो. आज सादर होणारा लेख अत्यंत महत्वाचा त्याचप्रमाणे वादग्रस्त देखील होऊ शकतो, परंतु विषयामागील गांभीर्य आपल्यासमोर मांडणे आवश्यक वाटले. आपण प्रत्येक जण आपापल्या देवांप्रती तसेच सणांप्रती असलेली भावना गांभीर्याने तसेच श्रद्धेने जपत असतो, आणि नेमका याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन बाजारात येणारी मूर्तीरुपी शोभेच्या वस्तू, चित्रे, कापसापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंमधून ते सार्वजनिक सणांमध्ये भक्तांच्या दिसत असलेल्या उत्साहातून घडत असलेल्या गोष्टींमधून आपणच आपल्या भावनेची चेष्ठा करून घेत आहोत, आणि आपण नकळतपणे त्यात अडकलो आहोत. या विषयाचा बऱ्याच दिवसांपासून मानसिक त्रास होत होता, तो या लेखाद्वारे मांडून माझे मन हलके करत आहे आणि यातून आपण चांगला आशय घेऊन अशा गोष्टींना पाठबळ न देता यावर प्रतिबंध आणू शकलात तर हा लेख खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचला असे समजेन.

तर मित्रांनो, एकीकडून आपण आपल्या वर्षानुवर्षे जपलेल्या संस्कृती तसेच परंपरेला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो, पण दुसरीकडे भावनेला जपण्यात आपल्याचकडून काहीअर्थी हेळसांड होतांना दिसत आहे. सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या उदाहरणाने सुरुवात करता हे लक्षात येईल की जो सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सर्व समाजाला एकत्रित आणण्यासाठी सुरु केला तोच गणेशोत्सव व्यावसायिक व चढाओढीच्या शर्यतीत एवढा गुरफटला आहे कि काही काळी सर्वसामान्यांना सार्वजनिक गणेशाचे सुलभरीत्या होणारे दर्शन देखील दुर्लभ झाले आहे, दर्शनासाठी तासंतास ताटकळत उभ्या असलेल्या भक्तांना वाईट वर्तणुकीला सामोरे जावे लागते आणि अशातच आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने ठेवलेल्या “राजा” या उपाधीला देखील स्पर्धात्मक चढाओढीचे गालबोट लागले आणि गल्लोगल्ली “राजा”, “युवराज”, “चिंतामणी” अशा अनेक नावांनी लाडका बाप्पा आरूढ झाला. तसेच या स्पर्धेत गणेशाची अनेक रूपे आपल्याला पाहायला मिळतात, त्यातील काहींना पुराणाची पाठराखण असते त्याला काही हरकत नाही. आपला लाडका बाप्पा आपल्याला कोणत्याही रूपांत म्हणजे बालरुपात, मूळ रूपात इतकेच काय तर लहान मुलांच्या चित्रपटांतून देखील आवडत होता, तिथपर्यंत ठीक आहे, परंतु सध्या AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) च्या माध्यमांतून मनाला येईल तसे बाप्पाचे दर्शन घडवून सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी मिळवली जात आहे, त्यापुढे जाऊन इतर देवांना, सजीव महंत आणि विटंबना म्हणजे इंग्रजी मधील कार्टून पात्रांना गणेशरूपात दाखवून श्रद्धेचा कहर आणि भावनेला पायदळी तुडवण्याचे किळसवाणे प्रकार सुरु आहेत. आपण भावनेच्या भरात बाप्पाला देखील शर्यतीत ओढले आहे, याचा विसर पडून हे विसरलो आपणच आपल्या देवांचा, संस्कृती, परंपरेचा तथा भावनेचा आदर केला नाही तर इतरांकडून कशी अपेक्षा करू शकतो, नाही का. खरंच याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. असो, हि व्यथा बाप्पाचरणी वाहून आपण पुढे चलूया.

फक्त गणेशोत्सव नव्हे तर प्रत्येक हिंदू सणांमध्ये अति उत्साहाच्या भरात आपणच आपल्या भावनेची चेष्ठा करत असतो. सोशल मीडियावर पसरणारे अनेक आक्षेपार्ह विनोदी स्वरूपात तसेच पर्यावरणाचे दाखले देऊन मांडलेले सण-विरोधी संदेश, आणि चित्रे आपल्या सणांचे गांभीर्य व त्यामागील उत्साह कमी करत असतात. आधीच दिलेल्या संदर्भात म्हंटल्याप्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाचे कोणतेही रूप आपल्याला मनमोहक वाटते, याचा अर्थ असा होत नाही कि त्याला कोणत्याही आक्षेपार्ह स्वरूपात जनतेसमोर आणावे, तसेच गणपती बाप्पा किंवा अन्य देव हे बालचित्रपटापर्यंत ठीक होते परंतु पुढे जाऊन त्यांची खेळणी बनवून लहानग्यांच्या हातात देऊन नकळतपणे त्या त्या देवांचे अपमान होऊ लागले, म्हणजे लहानग्यांकडून इकडे तिकडे खेळण्याप्रमाणे फेकली जातात आणि आपण पण निमूटपणे ते पाहत असतो. देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू अर्थात दिवे, पणत्या, लामणदिवे, अगरबत्ती लावण्याचे पात्र अश्या अनेक वस्तूंना आकर्षित करण्यासाठी त्यावर विविध देवतांचे फोटो किंवा आकार लावले जातात आणि ग्राहक हौशेपोटी त्या वस्तू घेतातही, परंतु देवांचे ते फोटो वा आकार चुकीच्या ठिकाणी लावल्याने होणारा अनादर दुर्लक्षित राहतो. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील, आणि आपणाला हा लेख वाचताना कळतही असेल कि नकळतपणे का होईना आपणच  श्रद्धेच्या अतिउत्साहात बाजारात येणाऱ्या कोणत्याही अत्यावश्यक नसणाऱ्या गोष्टी फक्त आकर्षण म्हणून विकत घेत असतो, आणि आपल्याच भावनेचा अनादर करत असतो. बाजारात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्या श्रद्धा व भावनेला गृहीत धरून बनवल्या जात नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. 

विषयावर बोलू तेवढे कमी आणि उदाहरणे तर असंख्य आहेत, परंतु मी माझ्या भावनेला आवर घालून एवढेच सांगेन कि आपण आपली श्रद्धा मग ती कोणावरही असो, देव किंवा सण, श्रद्धा डोळसपणे ठेवा आणि ती व्यक्त होतांना भावनेच्या आहारी जाऊन कोणतेच चुकीचे पाऊल उचलून समाजात घडणाऱ्या अशा आक्षेपार्ह गोष्टी तथा वर्तणुकींना खतपाणी घालू नका, अन्यथा आपली संस्कृती, परंपरा आणि आपली श्रद्धा फक्त आपल्या बोलण्यात राहील आणि कृतीतून त्यामागील भावनेची चेष्ठा होत राहील.

देव आपल्या सर्वांना सद्बुद्धी देवो, हि मनापासून इच्छा.

हा लेख जर खरंच मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा हि विनंती.                     

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *