प्रगती शुन्याकडे

प्रगती शुन्याकडे
प्रगती शुन्याकडे - विषय म्हंटलं तर मजेशीर पण तसाच गंभीर आणि विचार करायला भाग पाडेल असा आहे. प्रगती तर हवीच, आणि ती कालांतराने वा बदलत्या विचारसरणीनुसार घडतेही, परंतु ती होत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतो, परिणामी त्याचे दुष्परिणामही दिसू लागतात. या सर्व बाबी मी माझ्या विचारांतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे,
प्रगती शुन्याकडे – विषय म्हंटलं तर मजेशीर पण तसाच गंभीर आणि विचार करायला भाग पाडेल असा आहे. प्रगती तर हवीच, आणि ती कालांतराने वा बदलत्या विचारसरणीनुसार घडतेही, परंतु ती होत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतो, परिणामी त्याचे दुष्परिणामही दिसू लागतात. या सर्व बाबी मी माझ्या विचारांतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे, आणि तुमच्या प्रतिक्रियांमधून ते कितपत यशस्वी होईल हे लवकरच समजेल. माझे ह्या विषयाबद्दलचे विचार मी काही मुद्द्यांवरून स्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.
स्थलांतर – स्थलांतर म्हणजे काही कारणास्तव एका भौगोलिक स्थानावरून दुसऱ्या स्थानापर्यंत केलेला प्रवास, जो तात्पुरता वा कायमस्वरूपी असू शकतो. स्थलांतर करण्यामागे बरीच करणं असू शकतात परंतु जी प्रमुख आणि महत्वाची म्हणता येतील ती आहेत – नैसर्गिक, सामाजिक, वैयक्तिक, आर्थिक, व शैक्षणिक ई. आता आपण स्थलांतरामागची कारणं जाणून घेतली पण सर्वश्रुत असलेलं मूळ कारण एकच आहे ते म्हणजे आयुष्य जगताना लागणारी स्थैर्यता. आयुष्य जगताना नमूद केलेल्या कोणत्याही कारणांमुळे येणारे अडथळे कोणालाही नकोच असतात. चला आता कारणं तर पाहिली परंतु वास्तविक जीवनातली उदाहरणंही लक्षात घेऊ आणि ती टाळता येऊ शकतात का याचाही आढावा घेऊ.
आता थोडा मजेशीर तेवढाच गंभीरपणे घ्यायचा विषय – शैक्षणिक पद्धती. आजची पिढी जे शिक्षण घेते त्यात आपण लहानपणापासून आपल्या मुलांकडून फार अपेक्षा बाळगतो आणि त्यांना शिक्षणाच्या दबावाखाली आणतो. पुन्हा कारणं तीच आहेत, स्पर्धा आणि शिक्षणपद्धतीमधील बदल. आपली किंवा आपल्या आधीची पिढी म्हणजे आपले आई-वडील ह्यांनी घेतलेलं शिक्षण बघा. ह्या दोन वर्गांनी जे शिक्षण घेतले त्यावर त्यांनी स्वतःची वैयक्तिक, सामाजिक, आणि आर्थिक जबाबदारी संभाळलीच ना. त्यांनी ज्या शिक्षणपद्धतीमध्ये शिक्षण घेतले त्यात मातृभाषा आणि स्थानिक भाषांना प्रथम प्राधान्य होते आणि नंतर प्रादेशिक. उदा. महाराष्ट्रामध्ये मराठीला प्रथम प्राधान्य आणि नंतर प्रादेशिक म्हणजे हिंदी व इंग्रजी. विद्यार्थीही आवडीने शिक्षण घेत होते. दुसऱ्या बाजूला आताची शिक्षणपद्धती बघितली तर स्थानिक भाषांचे प्राधान्य कमी झालेले दिसते आणि इंग्रजी भाषेमध्ये शिक्षणाची सक्ती अर्थात पर्याय उरला आहे. प्रगतीच म्हणूया आपण याला कारण स्पर्धा आणि बदललेली व्यवस्था.
बदलती जीवनशैली – बदलती जीवनशैली हा लेखात वर्णन केलेल्या मुद्द्यांचा एक भाग आहे असे मला वाटते. आपण जी जीवनशैली जगत आहोत त्याला प्रगती म्हणावी कि अधोगती हे तुम्ही पुढे मांडलेल्या विचारांवरून ठरवा.
आपली पूर्वीची जीवनशैली पहा – मातीच घर, मातीची चूल, जास्तीत जास्त पायी प्रवास, परंपरागत व्यवसाय, निसर्ग सान्निध्य, एकत्रित कुटुंबपद्धती, कौटुंबिक विचार विनिमय, भेटीगाठी, प्रदूषण विरहित वातावरण त्यामुळे कमी आजारपण, स्पर्धा कमी त्यामुळे कमी दगदग, कष्टाची सवय, सुनिश्चित दिनचर्या, अजून बरेच काही. जसजसे प्रगतीच्या वाटेवर निघालो, तसतसे या सर्व गोष्टी एक-एक करत मागे पडू लागल्या. राहणीमान, जेवणपद्धती बदलली, नोकरी धंद्यामुळे दगदग वाढली आणि परिणामी आरोग्यावर वाईट परिणाम दिसू लागले. आता जी आधुनिक जीवनशैली आपण जगतोय ती वरवर तर फार सोयीस्कर दिसते पण तेवढीच तकलादू आहे. आपण एक नकली जीवन जगत आहोत. आता उदाहरणासह स्पष्टीकरण देतो. पहिलं तर आपल्याला शारीरिक कष्टाची सवय कमी झाली आहे, त्यामुळे मग व्यायामाच्या नवनवीन पर्यायांकडे धावपळ करून त्यामागे पैसे आणि वेळ खर्ची जात आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी हि आपल्याला अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे. दुसरं उदाहरण थोडं हटके आहे. आजकाल आपण पारंपरिक जेवणही बाहेरून मागवून त्याचा आस्वाद घेतो व मोठ्या गर्वाने त्याचा मित्रमैत्रिणींकडे उल्लेख करतो. किती हे हास्यास्पद. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपण आपली परंपरा आणि पारंपरिक जीवन पद्धती जपायला कमी पडलोय.
थोडक्यात मुद्दा मांडला कारण मी जे मुद्दे मांडत आहे त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे आणि थोडक्यात संपवणं त्याहूनही कठीण.
निसर्गाचा असमतोल – हा मुद्दा फार महत्वाचा आहे कारण तो ह्या लेखाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. प्रगती करता करता आपण जसे स्वतःच्या आयुष्यात बदल घडवले तसेच निसर्गाकडेही दुर्लक्ष केले, ज्याचे फार मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.
बदललेली जीवनशैली, स्पर्धा, आधुनिकीकरण आणि हे सर्व करताना आपल्या सर्वांचे झालेले दुर्लक्ष यामुळे निसर्गाचा असमतोल वाढला आहे. गावांचे झालेले शहरीकरण, वाढते कारखाने, वाढत्या लोकसंख्येमुळे झालेले भौगोलिक बदल, आणि अशी अनेक कारणं आहेत. वाढते उद्योगधंदे आणि कारखान्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण तसेच वायुप्रदूषण वाढले. वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी वाढली, त्यामुळे शहरांची वाढ झाली परिणामी शहरांची वाढ होताना निसर्गाची हानी होत आहे. असेच काही जगाच्या पाठीवर अन्य ठिकाणीही घडत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणजे “ग्लोबल वॊर्मिंग”. ह्या ग्लोबल वॊर्मिंगचा फटका जगातील सर्वच देशांना कमीजास्त प्रमाणात बसत आहे. ऋतुमान व तापमानात झालेले बदल हा त्याचाच एक भाग आहे. निसर्गाने जसे आतापर्यंत आपल्याला जपले आहे तसेच आपलीही जबाबदारी आहे त्याला जपण्याची. जर आपण त्यात कुचराई केली तर निसर्ग आपला प्रकोप दाखविल्याशिवाय राहणार नाही.
वरील सर्व मुद्द्यांचा व घटनाक्रमांचा आढावा घेता हे लक्षात आले असेल कि आपण सर्व स्तरांवर प्रगती तर केली पण हीच प्रगती आपल्याला शुन्याकडे घेऊन चालली आहे.
हा लेख हा सर्वस्वी माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून केलेला विचार आणि मत आहे, परंतु ह्यात काहीतरी तथ्य आहे हे कळलेच असेल व त्यावर विचार व्हावा हि विनंती वजा आशा बाळगतो.
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, आणि जर खरंच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा .
धन्यवाद.