पुतळे नको, विचार हवे

पुतळे नको, विचार हवे
पुतळ्यांचा उल्लेख हा फक्त पुतळ्यापुरता मर्यादित नाही तर पुतळे, फोटो अर्थात प्रतिमा, स्मारके, सार्वजनिक स्थळांना दिलेली नावे व बरेच काही ज्यांना आपण श्रद्धास्थान मानतो. श्रद्धास्थान म्हणजेच आपली देवीदेवतांची देवळं, संत-महात्मे, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ राजकीय नेते, इतकेच काय तर आपले आजी-आजोबा, आई-वडील इत्यादींचाही समावेश असू शकतो. आपण आपली श्रद्धा विषयात सांगितल्याप्रमाणे त्यांचे पुतळे किंवा अन्य प्रकारे व्यक्त करतो, पण मला वाटते कि हे एवढंच पुरेसं नाही.
नमस्कार वाचक मित्रहो. आजचा हा लेख वा विचार हा मी कोणताही राजकीय टीकास्त्र म्हणून मांडत नाही आहे, परंतु हा विषय तुम्हाला सामाजिक, राजकीय व वैयक्तिक विश्लेषणातून पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि तुम्हाला तो नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो.
विषय वाचून तुम्हाला त्याचं गांभीर्य कळेलच असं नाही, म्हणून मी तीन वेगवेगळ्या स्तरांवर घडणाऱ्या घटनांचा आधार घेणार आहे. कोणताही विचार हा वादग्रस्तच हवा कारण त्यातूनच त्यामागचे चांगले व वाईट हेतू सर्वांसमोर येतात. वादग्रस्त म्हणजे खरे-खोटेपणा मांडण्यासाठी केलेलं विचारमंथन, परंतु ते ऐकणारा व मांडणारा हा त्या विषयाचा तितकाच अभ्यासक असावा लागतो, तरच त्या विषयाला त्याचा न्याय मिळतो. चला तर आपण विषयाकडे वळूया, जिथे मी माझ्या विचारांतून हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रथम आपण राजकीय व सामाजिक दृष्टीने या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करू, कारण दोन्हींचा प्रभाव हा एकमेकांच्या दृष्टीने महत्वाचा व विचारनीय आहे. राजकारण व राजकारण्यांचा समाजावर किती प्रभाव आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आपण सर्वांनी पहिले असेल कि भारतात अनेक ठिकाणी वर सांगितल्याप्रमाणे विविध राजकीय पक्ष असो वा सरकारकडून श्रद्धास्थानांची उभारणी केली जाते, त्यात प्रामुख्याने पुतळे व स्मारकांचा समावेश आहे. त्यात भर ती काय तर पुतळ्यांची उंच उभारणी आणि राजकीय पक्षानुरूप त्यांच्या आदर्श व्यक्तींचे पुतळे उभारण्यावर भर देण्यात येतो, भले त्यांचा कितीही आर्थिक भर आपल्या अर्थव्यवस्थेवर पडला तरी चालेल, पर्वा कोणाला, आपला उद्देश्य पूर्ण झाला ह्यात आनंद. हा एक चर्चेचा व वादाचा विषय आहे, ज्यात मी सध्या पडणार नाही. आजकाल हि एक राजकीय स्पर्धा झाली आहे आणि आपला समाजही त्याला पाठिंबा देऊन बळी पडतो हि खंत, कारण शेवटी समाजाच्या भावनांचा खेळ केला जातो हे त्यांना उमगत हि नाही. माझं एक प्रामाणिक मत आहे कि या राजकारण्यांनी पुतळ्यांच्या उंचीवर लक्ष केंद्रित न करता त्या आदर्श व्यक्तींचे अथवा देवी-देवतांचे आदर्श अंगीकृत करून समाजासमोर आणल्यास त्यांचा समाजाला व पर्यायी त्या त्या राजकीय पक्षालाच फायदा होईल. ज्यांचे आदर्श व विचार लक्षात घेऊन आपण पुतळे व स्मारके उभी करतो, त्यांचे विचार पुढे नेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, तरच त्यांच्या कार्यांचा आदर होईल आणि नक्कीच तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल. प्रत्येक नागरिकाने एक सामाजिक कर्तव्य म्हणून हि जाणीव स्वतःला तसेच राजकारण्यांना करून द्यावी हि काळाची गरज आहे, नाहीतर ह्या पुतळ्यांच्या व वर सांगितल्याप्रमाणे सर्व श्रद्धास्थानांच्या गर्दीमध्ये आदर्श व विचारच हरवून बसतील.
आता वैयक्तिक दृष्टिकोनातून विचार केला तरी हेच लक्षात येईल कि जसे राजकीय, सामाजिक तसेच वैयक्तिक आयुष्यामध्ये हि आपल्याकडून बऱ्याचदा ह्याच चुका होताना दिसतात, काही वेळा जाणतेपणी वा अजाणतेपणी. तुम्ही म्हणाल कि आम्ही कधी पुतळे बांधले नाही वा स्मारकेही नाही, तर इथे मी म्हणेन की काही ठिकाणी ह्याही घटना घडल्या आहेत पण बऱ्याचदा ह्या गोष्टी स्वार्थापोटी केल्या जातात. दुसरीकडे आपण बऱ्याचदा पाहतो कि बऱ्याच घरात आजी व माजी सदस्यांचे मोठमोठाले फोटो भिंतीवर आढळतात, तेही दिवाणखान्यात, हे कमी तर काय बंगल्याला, गाडीच्या काचेवर, वगैरे उदा. “आई-वडिलांची कृपा”, “दादांची पुण्याई” अशी काही फलके आढळतात. माझं इथे वैयक्तिक मत आहे कि सर्वांनी यावर विचार करावा कि खरंच अशा प्रदर्शनाची गरज आहे? काही लोकांनी हाही अनुभव घेतला असेल कि दिवाणखान्यात जिथे आई-वडील व कुटुंबाचा भव्य असा फोटो टांगला आहे आणि त्याच तसबिरीसमोर त्यातील आदर्श व्यक्तींचा अनावधानाने वा असमंजस्यातून अवहेलना होत आहे, याला काय अर्थ आहे. म्हणून सांगतो, मांडलेला विषय असो किंवा माझा वैयक्तिक विचार – “पुतळे नको, विचार हवे”, याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा आणि प्रतिक्रिया नोंदवावी.
आपल्याकडे काही कुटुंबांना मोठा इतिहास आहे, काही एकत्रित कुटुंबांचा आदर्श ठेवतात, तर सर्वसामान्यपणे असं उघड गुपित आहे कि आपले आई-वडील, जे आपली परंपरा, संस्कृती जपता जपता कौटुंबिक जबाबदारीही उत्कृष्टरित्या सांभाळतात, त्यांचा आदर्श आपण तसबिरीपर्यंत वा एका फलकापर्यंत मर्यादित न ठेवता, तो आपण जपावा तसेच तो समाजापर्यंत आणि आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याकरिता प्रयत्न करावा.
विषयाचा सार म्हणून दोन गोष्टी नमूद करतो. एक म्हणजे पुतळे, स्मारके, फोटो, व नावं लिहून तुमचा आदर्श, प्रेम वा तुमची श्रद्धा सिद्ध होत नाही तर ती समोरील व्यक्ती वा समाजाकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून सिद्ध होते, हे नेहमी लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे ह्या जगात सर्व नश्वर आहे पण विचार आणि आदर्श हे अमर आहेत, हे त्रिकालवादी सत्य आहे. म्हणूनच सांगतो – “पुतळे नको, विचार हवे”.
जर हा लेख तुम्हाला मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा, हि विनंती.
धन्यवाद.