नवीन वर्षाचे स्वागत – संकल्प कि व्यसन?

नवीन वर्षाचे स्वागत - संकल्प कि व्यसन?
संकल्प कि व्यसन? तुम्ही केलेला प्रत्येक संकल्प मनापासून व एखाद्या व्यसनाप्रमाणे सांभाळला गेला पाहिजे, कारण व्यसन सुटणे फार कठीण असते किंवा एक व्यसन सोडण्यासाठी पर्यायी व्यसनाचा अवलंब करावा लागतो. ह्या येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात अशाच एका चांगल्या व्यसनाने अर्थात संकल्पाने होवो, तसेच तो अबाधित राहावा हि सदिच्छा.
नमस्कार वाचकमित्रहो. वर्षअखेर उंबरठ्यावर आहे, पुन्हा एका वर्षाचा अखेर आणि एका नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. सवय किंवा प्रथेप्रमाणे लहान थोरांपासून सर्वच जण नवीन वर्षाच्या आगमनाच्या जल्लोषाच्या तयारीत मग्न आहेत, आणि त्याच बरोबर नवीन संकल्पांच्या हंगामाची सुरुवात झाली आहे. वाचकांपैकी बऱ्याच जणांना याचा कल समजला असेल, तर काहींनी ह्या हंगामाचा अनुभव घेतला देखील असेल. आजच्या लेखात ह्याच प्रथेवर विस्तृतपणे भाष्य केले जाणार आहे आणि त्यात कसा बदल करता येईल हेही ठळकपणे मांडण्यात येईल.
जानेवारी महिन्याने सुरुवात होणारे वर्ष हे सर्वमान्य व्यावहारीक नवीन वर्ष आहे. ह्या माहितीचा लेखाशी जास्त काही संबंध नाही, परंतु ह्या नवीन वर्षाची सुरुवात अनेक चांगल्या वाईट गोष्टींनी होते हे दुर्दैवी आहे. वर्षाच्या अखेरीला म्हणजे डिसेम्बर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवीन वर्षाच्या आगमनाच्या जल्लोषाचे नियोजन व अनेक नवीन संकल्पनेचा हंगाम सुरु होतो. वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ डिसेम्बरला विविध प्रकारच्या मेजवान्यांचे आयोजन होते, ज्यामध्ये रात्रभर संगीतमय तसेच मद्यप्राशनाच्या वातावरणात नवीन वर्षाचे आगमन शुभेच्छांच्या देवाणघेवाणीने केले जाते. ह्या सर्वात भर म्हणून कि काय नवीन गोष्टींचे अर्थात सवयीचे संकल्प केले जातात, ज्यांचे पालन होण्याचे प्रमाण ५ – १०% एवढेच असावे किंवा बऱ्याच अंशी त्या रात्रीच्या अंधारात वा जल्लोषात विरली जातात. जल्लोष वा संकल्प करणे वाईट नव्हे, तर त्या संकल्पनेचे तंतोतंत व कायमस्वरूपी पालन होणे गरजेचे आहे आणि ते कसे साध्य करता येईल हे लेखात पुढे पाहणार आहोत.
विषयामध्ये म्हंटल्याप्रमाणे “संकल्प कि व्यसन” हे वाचून वाचक थोडे आश्चर्यचकित झाले असावेत. नवीन वर्षात बऱ्याच चांगल्या कामांच्या वा सवयीच्या सुरुवातीचे संकल्प केले जातात, उदा. व्यसनमुक्ती, व्यायाम, पोट कमी करणे, खोटे न बोलणे, अभ्यास किंवा नोकरी संदर्भातील काही, अशा अनेक संकल्पांतून आपल्यापैकी अनेक वाचक गेले असतील आणि त्यापैकी किती जणांनी त्यांची पूर्ती केली याची पडताळणी त्यांनीच केलेली बरी. ह्या लेखाद्वारे मला सांगावेसे वाटते कि ज्यांना ह्या येणाऱ्या नवीन वर्षासाठी काही संकल्प करावासा वाटत असेल तर तो एका व्यसनासारखा करावा. हो, मी तर म्हणतो कि कोणालाही कोणत्याही चांगल्या सवयीचे व्यसन असायला हवे, कारण एक वेळ संकल्प मोडू शकतो वा त्यात खंड पडू शकतो, परंतु व्यसन सुटण्याचे प्रमाण हे फारच कमी आहे आणि प्रत्येकाने संकल्प हा एका एका व्यसनासारखा बाळगावा. लेखात आधीच नमूद केल्याप्रमाणे जानेवारीपासून सुरु होणारे नवीन वर्ष हे व्यावहारिक असल्या कारणाने संकल्प देखील व्यावहारिक असावेत, ज्यांचा वैयक्तिक जीवनाशी संबंध नसावा. जर तुम्हाला वैयक्तिक संकल्प करायचा असेल तर उगवणारा प्रत्येकदिवस हा नवीन वर्षाचा पहिला दिवस समजून संकल्प करा आणि तो एका व्यसनासारखा पाळा.
ह्या लेखाचा किंवा माझा उद्देश्य व्यसनाला पाठिंबा देणे नाही, तर तुम्ही केलेला प्रत्येक संकल्प मनापासून व एखाद्या व्यसनाप्रमाणे सांभाळला गेला पाहिजे, कारण व्यसन सुटणे फार कठीण असते किंवा एक व्यसन सोडण्यासाठी पर्यायी व्यसनाचा अवलंब करावा लागतो. ह्या येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात अशाच एका चांगल्या व्यसनाने अर्थात संकल्पाने होवो, तसेच तो अबाधित राहावा हि सदिच्छा.
हा लेख जर तुम्हाला खरच मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा हि विनंती.
आपला,
विनोद चारी ९९८७० ३०९७८
विनोद चारी ९९८७० ३०९७८