Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

भक्तीच्या आड… बाप्पाच्या सहनशीलतेची परीक्षा!

नमस्कार वाचक मित्रहो. गणेशोत्सवाची आतुरता प्रत्येकाला असते आणि प्रत्येकजण आपापल्या परीने तो उत्साहात साजरा करत असतो. दिवसेंदिवस या गणेशोत्सवातील उत्साहात वैयक्तिकरित्या बदल होत आहे, आणि यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची संभाव्य स्थिती पाहता, मला माझा रोष अनावर झाला आहे. आजच्या लेखात याबद्दल माझे मत फार स्पष्ट पद्धतीने मांडणार आहे. ह्या रोषामागील भावना गंभीर आहे, म्हणून जर यातून कोणाच्याही भावना दुखावत असतील, त्याला मी काही करू शकत नाही.

यंदाच्या २०२६ वर्षीच्या गणेशोत्सवाची सर्वात दुखद सुरुवात म्हणजे दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास मुंबई मधील भुलेश्वर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती आगमनाच्या वेळी मूर्ती कोसळून त्यात मंडळाच्या अध्यक्ष व सचिव यांचे दुःखद अपघाती निधन व काही कार्यकर्त्यांचे जखमी होणे, अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. ज्या कार्यकर्त्यांचा दुर्दैवी अंत झाला, त्याच्या कुटुंबांना या दुःखातून सावरायला बाप्पा धीर देवो, ही बाप्पा चरणी प्रार्थना.

हि घटना ताजी असतांनाच मुंबई मध्येच कुर्ल्याजवळ दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश मूर्ती कोसळून २ कार्यकर्ते जखमी होण्याची आणखी एक घटना घडली आहे.

वरील दोन्ही घटनांनी गणेशोत्सवाच्या आनंदाला तर गालबोट लावले आहेच, आणि हे दुःखद प्रसंग कोणा एका मंडळावर किंवा पीडित कुटुंबावर उद्भवले नाहीत तर दिवसेंदिवस मनुष्य प्राणी हा भक्तीच्या आड देवापेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? हा प्रश्न प्रत्येक गणेशोत्सवात मनाला चटका लावून जातो.

कालांतराने आपण अशा घटना विसरतो, किंबहुना बऱ्याच विसरलो देखील आणि काय तर म्हणे आपण यातून सावरलो असल्याचा बडेजाव मिरवतो. खरंच असे होते का? हा प्रश्न कोणत्याही सणांमध्ये घडलेल्या अपघातात आपला कुटुंबीय गमावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या पीडितांच्या कुटुंबियाला विचारा म्हणजे कळेल कि असे कुटुंबीय कधीच सावरलेले नसतात आणि अशा घटनेने त्यांच्या मनात त्या सणाबद्दल काहीअंशी रोष असतो तसेच प्रत्येक वर्षी त्या सणानिमित्त उत्साहाआधी आपल्या पीडितांचे दुःख आठवून मन दुखी होते.

वरील अपघाताच्या घटना या आजच्या लेखाचा मुद्दा नसून कळत नकळतपणे सर्व स्वयंघोषित गणेशभक्तांकडून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भक्तीच्या प्रदर्शनाआड गणपती बाप्पाच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्याचा परिणाम तर नाही किंवा बाप्पा आपल्याला काही सुचवू तर पाहत नाही ना? या ना असंख्य प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आहे.

गणेशोत्सव हा कौटुंबिक असो वा सार्वजनिक, दोन्हींमध्ये आपल्याला स्वयंघोषित भक्तगणांच्या भक्तीचा उद्रेक पाहावयास मिळतो आणि दरवर्षी या उद्रेकात भरच पडते आहे. कौटुंबिक भक्तीचा उद्रेक हा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु जेव्हा हे सार्वजनिक उत्सवात पाहायला मिळते तेव्हा त्या सणाचा आणि तो ज्याप्रकारे साजरा केला जातो यावरून आपली संस्कृती व परंपरेचा प्रसार होत असतो, आणि सध्या होणाऱ्या गणेशमूर्तींचे स्वरूप, मिरवणुका तसेच यंदा घडलेल्या अपघाताच्या घटना या सर्वांद्वारे आपण आपल्या हिंदू संस्कृतीचे कोणते दर्शन घडवत आहोत? हा प्रासंगिक प्रश्न नाही तर प्रसंगावधान होऊन अपघातासारख्या घटना टाळण्यासाठी तसेच आपल्या संस्कृती – परंपरेचे रक्षण करण्यासाठी सर्वच स्तरावर जनजागृती होण्याची गरज आहे आणि हि सुरुवात प्रत्येकाकडून होणे आवश्यक आहे. प्रत्येक चांगल्या सवयीची सुरुवात स्वतःपासूनच व्हावी लागते.

लोकमान्य टिळकांकडून सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश्य सणानिमित्त जनतेला एकत्र आणण्याचे होते. सध्या हे एकत्रीकरण स्पर्धात्मक झाले आहे, आपापल्या मंडळाच्या गणपती बाप्पाकडे गर्दी कशा प्रकारे खेचता येईल यासाठी नानाविध प्रयत्न केले जातात, त्यामुळे भक्ती कमी आणि स्पर्धा जास्त होऊ लागली आहे आणि या सर्वात आपल्या बाप्पाची नाहक कसरत होत आहे, हे कोणाच्याच लक्षात न येणे, हे मोठे दुर्दैव.

आतापर्यंत आपण आपल्या लाडक्या बाप्पाला कोणातरी दुसऱ्या देवाच्या स्वरूपात पहिले आहे, परंतु यंदा प्राणी, बलदंड शरीरयष्टी तसेच क्रूर रूप असलेला, इतकंच काय तर चित्रपटातील पात्राच्या स्वरूपात देखील घडवले आहे. पण आपल्या स्वयंघोषित भक्तांच्या भक्तीचा उद्रेक इथेच थांबला नाही आहे. यंदाच्या वर्षी म्हणजे २०२६ मध्ये सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचं झालंच तर गणपती बाप्पाच्या उंची बरोबरच बाप्पाच्या बॅलन्सिंग मुर्त्यांची ट्रेंड पाहायला मिळत आहेत. म्हणजे पूर्वी आपला लाडका बाप्पा गणेशोत्सवात भव्यदिव्य, आसनस्थ तथा कोणत्या तरी प्राणीरूपी वाहनावर तसेच भावपूर्ण व प्रसन्न मुद्रेत ११ दिवस मोठ्या थाटामाटात विराजमान व्हायचा. असा गणेशोत्सव पाहायला खरंच फार मजा यायची. यंदा म्हणा किंवा येत्या काळात आपल्या बाप्पाला बॅलन्सिंग, सार्वजनिक मंडळाच्या आग्रहास्तव किंवा मूर्तिकाराच्या अन्य कोणत्या नवनवीन कलाकौशल्यामार्फत किती सहन करावे लागणार आहे, हे पाहून बाप्पाला तर त्रास होतच असेल परंतु असे गणपती पाहतांना खऱ्या गणेश भक्तांच्या मनाला किती वेदना होत असतील, याचा विचार होणे गरजेचे आहे.

सध्या प्रसिद्ध होण्यासाठी हिंदूंचे सण आणि ते साजरे होण्यावर प्रश्न उचलणे सर्रास सुरु आहे. यंदाही डीजे या वाद्यप्रकारावरून व विद्युत रोषणाई वरून वाद निर्माण झाला आहे. माझे असे वैयक्तिक मत आहे कि आपले हिंदू वार्षिक सण आहेत, ते दिमाखात आणि दणक्यातच साजरे व्हायला हवेत, पण त्याला संस्कृतीची मर्यादा असावी. उदाहरणार्थ, होळी – दहीहंडी आली कि पाण्याचा प्रश्नाचा वाद उखरून काढणे, दिवाळी सणात ध्वनी आणि वायू प्रदूषण, इत्यादी आपल्या प्रत्येक सणांत असे अनेक वाद निर्माण करून आपल्या सणांचा उत्साह कमी केला आहे, परंतु अशा मुद्दयांना कोणत्याही प्रकारचे महत्व न देता साजरे व्हायला हवेत. हे वाद कोणामुळे उत्पन्न होत आहे, हा मुद्दा कळीचा आहे त्यामुळे त्यात न पडता मूळ मुद्द्याकडे वळूया.

आपला लाडका बाप्पा उत्साहात वाजत गाजत आलाच पाहिजे, ११ दिवस दिमाखात विराजमान व्हावा आणि त्याचे विसर्जन देखील ततेवढ्याच भक्तिभावात होणे आवश्यक आहे. आता हा उत्साह दाखवण्याचे प्रकार बऱ्याच अंशी वादादीत आहेत आणि आपणच आपले हसू करून घेत असतो. म्हणजे बघा नां, बाप्पांचे आगमन तथा विसर्जन होताना मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचे वापर कमी आणि डीजे / विद्युत रोषणाई चे नवनवीन प्रकार आले, या झगमगीत वाद्यवृदांमध्ये आपल्याला गणपतीच्या गाण्यांचे बोल किंवा ताल कमी आणि अश्लील बोल असलेली गाणी ऐकायला मिळतात आणि त्यावर विचित्र नृत्यप्रकार करणारे गणेशभक्त दिसतात. त्यातच मूर्तींद्वारे केलेल्या कौशल्याचे अपघातरूपी दर्शन होते. बऱ्याच अंशी चूक आपलीच पण गालबोट लागते गणेशोत्सवाला.

सर्व गणेशभक्तांनी लक्षात घेतले पाहिजे की आपला बाप्पा हा कोणा एका मंडळाचा, गल्लीचा किंवा कोणत्या एका शहराचा राजा नाही तर तो गणांचा राजा आहे, सर्वप्रथम पूजनीय आहे. प्रत्येक गणेश मूर्तिकाराची कला हि अवर्णनीय व उल्लेखनीय असतेच आणि कायम राहील, त्यात काही शंका नाही परंतु आपल्या कलेच्या निपुणतेची झळ सणाच्या पावित्र्याला तसेच भक्तांच्या उत्साहाला पोहोचू नये, एवढीच माफक अपेक्षा आहे. गणपती हा १४ विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी म्हणून पुजला जातो, आणि ज्याकडे आपण कोणत्याही विद्येचे आणि कलेचे दान मागतो, त्याच्या समोर कलेचे असे प्रदर्शन करणे योग्य नाही.

ह्या लेखाद्वारे सर्व गणेशभक्तांना एवढीच विनंती आहे कि आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव पूर्ण जल्लोषात, धुमधडाक्यात, आगमन तसेच विसर्जन मिरवणुका देखील एकदम धुमधडाक्यात, ढोलताशांच्या गजरात झाल्याच पाहिजे, परंतु हे सर्व करताना कोणाला त्रास, इजा होऊ नये याची काळजी, तसेच आपले सण, संस्कृती व परंपरा या सर्वांचा मान राखून व मर्यादा सांभाळून व्हायला हवी. आपला गणेशोत्सव व इतर कोणतेही वार्षिक सण तेवढ्याच जल्लोषात साजरे व्हायला हवे, कारण वर्षातून एकदा साजऱ्या होणाऱ्या आपल्या सणांमुळे कोणतेही ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही ना पाणी टंचाई येणार आहे.

|| गणपती बाप्पा मोरया ||

हा लेख जर खरंच मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा, हि विनंती.

नमस्कार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *