Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

महिला सक्षमीकरण – कौटुंबिक गरज

महिला सक्षमीकरण - कौटुंबिक गरज

नमस्कार वाचक मित्रहो. आज या लेखात महिला सक्षमीकरणाबद्दल जे काही मांडले जाणार आहे, हे मला वैयक्तिकरित्या, तसेच बऱ्याच अनुभवांतून जाणवले आहे, म्हणून ते आपल्या समोर मांडणे फार महत्वाचे वाटले. माझे मत हे सर्वांचे मत असू शकत नाही, म्हणून नेहमीप्रमाणे विश्लेषण करून उदाहरणासहित मांडणार आहे. महिला सक्षमीकरणाबद्दल आपण बरेच काही वाचले असेल, आणि याच विषयावर आधारित माझ्या आधीच्या लेखात नाण्याची पहिली बाजू मांडली होती, ती म्हणजे महिलांना खऱ्या अर्थाने कसे सक्षम करता येईल व त्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न व्हायची गरज आहे. तर आजच्या लेखात नाण्याची दुसरी बाजू म्हणजे सर्वच महिलांना वैयक्तिक, सामाजिक व व्यावहारिक स्तरावर होणे अनिवार्य का आहे, हे गुपित समजावून सांगणार आहे.

महिला सक्षमीकरण आतापर्यंत खरंच आपल्याला वा विशेष करून महिला वर्गाला खऱ्या अर्थाने कळलेले नाही. सक्षमीकरण होऊ नये या मताचा मी नाही परंतु त्याचा मूलभूत अर्थ समजून घेणे व त्याचा पुरेपूर फायदा होणे आवश्यक आहे. मुद्द्याकडे वळण्याआधी आपण थोडी पार्श्वभूमी पाहूया.

पूर्वीच्या काळी, महिलांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, मग ती सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा कॊटुंबिक धर्तीवरील असो, इथे “पूर्वी” हा “काळ” लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण तो काळ आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि हळूहळू ती संस्कृती लोप पावत गेली आणि महिलांना समाजात आदराचे स्थान मिळाले आणि त्यात वृद्धीच झाली आहे. असो, पण या काळाचा प्रभाव अजूनही महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्याला दूषित करत असतो आणि फक्त विरोधाला विरोध करणे या दृष्टिकोनातून पुरुषवर्गाकडे पाहिले जाते, हे खेदजनक आहे.

काळ बदलला, विचार बदलले व महिला सक्षमीकरणाचा मुद्दा उफाळून आला. प्रगती पथावर विचार परिवर्तन होत असते, त्याला कोणीही अडवू शकत नाही. असो, काळानुसार महिलावर्ग शिक्षित झाला व पुरुषवर्गाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जबाबदार नागरिक बनण्यासाठी सक्षम झाला. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा उचलून धरण्यामागील कारणे पूर्णतः चुकीची नसली तरी या लेखात मांडण्यात येणारे कारण अधोरेखित करणे आवश्यक आहे, असे मला मनापासून वाटते. महिला सक्षमीकरणामुळे महिला वर्गामध्ये अहंपणाचा भाव कायमचा कोरला जाण्याआधी हे रोखता आले पाहिजे, यासाठीचा हा प्रयत्न समजावा.

आता काळाचा उल्लेख न करता आपण जर पाहिले तर लक्षात येईल कि व्यक्तिस्वातंत्र्य व शैक्षणिक मार्ग मोकळे झाल्यानंतरदेखील महिला वर्ग पूर्णपणे पुरुषांच्या बरोबरीने मग ते नोकरी-व्यवसायाच्या माध्यमातून घ्या, घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते, याचे कारण देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. पुरुष व महिला वर्गाने आपल्या संसाराच्या जबाबदारीचे भान ठेवून त्यात विभाजन केले होते, म्हणजे घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी पुरुष वर्ग नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडायचा तर घराची दुसरी महत्वाची बाजू म्हणजे घरातील कौटुंबिक पालन पोषणाची जबाबदारी हि महिला सक्षमपणे सांभाळत होत्या व दोघेही समतोल सांभाळून संसार चालवत असत. यात काही गैर नव्हते, याला कोणाचेही दुमत नसावे. पण म्हणतात ना, संसाराचा गाडा नीट चालण्यासाठी स्त्री-पुरुष हि दोन्ही चाके सुस्थितीत असणे आवश्यक असते, आणि एकालाही धक्का लागला तर संसाररूपी गाडा कोलमडू शकतो. वरील संस्कृती मध्ये असे पाहण्यात आले कि पुरुषांच्या अनुपस्थिती मध्ये बऱ्याच महिलांना अतोनात संघर्ष करावा लागला आहे, काहींचे संसार बऱ्याच अंशी कोलमडले देखील, आणि मला आपल्या सर्वांच्या निदर्शनास हाच छुपा मुद्दा आणून द्यावयाचा होता. तो म्हणजे, महिला सक्षमीकरण, म्हणजे फक्त पूर्वीच्या काळी महिलांची झालेली अवहेलना किंवा शैक्षणिक अभाव किंवा व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले नाही  म्हणून पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेर पडायचे आणि काहीतरी अनोखा पराक्रम केल्याच्या अविर्भावात राहणे, हा नाही. तर महिला वर्गाने आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक, संरक्षण (स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खंबीर), वैयक्तिक तसेच सामाजिक स्तरावर सक्षम होण्याबरोबरच हि एक “कौटुंबिक गरज” देखील आहे, हे समजून घ्यावे आणि भविष्यात हि गरज सध्याची वाढती महागाई, तसेच धावपळीचे जनजीवन पाहता आणखी भीषण होणार आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणामागील तथाकथित सर्व कारणे विसरून फक्त वरील गरज लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे पुरुषाच्या अनुपस्थितीमध्ये संसाराच्या गाड्याच्या या चाकाची उणीव महिलांचे हेच सक्षमीकरण भरून काढेल, आणि संसाराचा गाडा व्यावहारिक जीवनात सुरळीत सुरु राहील. कोणाचीही अनुपस्थिती कधीही भरून निघत नाही, हे जरी मान्य असले तरी हे जग कधी थांबले नाही ना पुढे थांबणार.

जाता जाता, मी असे एक जाज्वल्य उदाहरण देईन ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब – माता जिजाबाई भोसले. त्यांनी कौटुंबिक तसेच स्वराज्याची जबाबदारी या दोन्ही गरजा कोणताही अहंपणा न ठेवता कुशलतेने सांभाळल्या आणि त्यात पूर्णपणे यशस्वी देखील निभावल्या, याचे उदाहरण म्हणजे “रयतेचा राजा” म्हणून आपल्या मनात आजही नाव कोरून असलेले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज”. हि शिकवण संपूर्ण महाराष्ट्राला, भारत वर्षाला तसेच तमाम महिलावर्गाला देणाऱ्या जिजाऊंना शतशः नमन आणि हीच शिकवण अंगी बाळगून सर्व महिलांनी खऱ्या अर्थाने सक्षम बनावे, हि आशा बाळगतो.

हा लेख जर खरंच मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा हि विनंती.                     

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *