वाईटातून चांगल्याची निवड

वाईटातून चांगल्याची निवड
समाजात वावरतांना आपल्या सर्वाना चांगल्या - वाईट गोष्टीप्रमाणेच भिन्न स्वभावाची व प्रकारची माणसे भेटतात. चांगल्या गोष्टींप्रमाणेच चांगली माणसे हि आपल्या कायम लक्षात राहतात आणि वाईट घटनांप्रमाणे वाईट स्वभावाच्या माणसांना आपण दुर्लक्षित करतो वा विसरून जातो. आणि ह्या लेखाचा संदर्भ इथून सुरु होतो तसेच त्याच्या विश्लेषणातून तुम्हाला त्याचा वास्तविक जीवनात फायदा करून घेता येईल.
नमस्कार मित्रानो. नवीन लेख तुमच्यासमोर आणण्यास थोडा विलंब झाला, पण जरा हटके विषय आणला आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रतिक्रिया जरूर द्या.
समाजात वावरतांना आपल्या सर्वाना चांगल्या – वाईट गोष्टीप्रमाणेच भिन्न स्वभावाची व प्रकारची माणसे भेटतात. चांगल्या गोष्टींप्रमाणेच चांगली माणसे हि आपल्या कायम लक्षात राहतात आणि वाईट घटनांप्रमाणे वाईट स्वभावाच्या माणसांना आपण दुर्लक्षित करतो वा विसरून जातो. आणि ह्या लेखाचा संदर्भ इथून सुरु होतो तसेच त्याच्या विश्लेषणातून तुम्हाला त्याचा वास्तविक जीवनात फायदा करून घेता येईल.
माझ्या आधीच्या दोन्ही लेखातून यशस्वी ह्या शब्दाचा अर्थ कळला असेल (लेख वाचले नसतील तर जरूर वाचा), त्याचा संदर्भ मी देऊ इच्छितो. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक माणूस धडपड करत असतो आणि त्यासाठी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर ना? ज्यासाठी काय करता येईल हे मी आधीच्या लेखात नमूद केले आहे. असो. पण तुम्हाला असे वाटत असेल कि आपल्याला जी यशस्वी माणसे भेटतात किंवा ओळखीत असतील ती सर्व माणसे चांगली असतातच का तर उत्तर आहे – नाही. सहमत आहात का? नसाल तर थोडा वेळ घ्या आणि शांतपणे प्रश्न पुन्हा वाचा आणि दिलेलं उत्तर तपासा. ज्यांना उत्तर मिळालं नाही त्यांना आणि बाकी सर्वानाच सांगू इच्छितो कि घडणारी प्रत्येक वाईट गोष्ट आपल्याला काही शिकवून जाते तसेच यशस्वी माणसे जी स्वभावाने वाईट असतीलही परंतु आपल्याला काही नवीन शिकवून जातात अर्थात आपल्यालाच त्यातून काहीतरी चांगलं शिकायची इच्छाशक्ती किंवा मनाची तयारी असावी लागते. वाईट आहे म्हणून उगाच वाईट बोलू नये वा फक्त वाईटच शोधात राहू नका, काही चांगलं असू शकते का ह्यावरही भर द्या. पुढे तुम्हाला तुमच्या प्रश्नच उत्तर हि मिळेल आणि ह्या लेखातून मला जे सांगायचे आहे तेही कळेल.
उदाहरण द्यायचे झालं तर पौराणिक देईन कारण वर्तमान आयुष्यातील दिलं तर त्यावर वाद-विवाद सुरु होईल आणि ते मला नको, कारण ह्या लेखातून मूळ मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचावा हीच धडपड. तर उदाहरण आहे – “रावण”. अनेकजण आतापर्यंत हसलेही असतील कारण काय तर रावणाची जी प्रतिमा आपल्यात आहे ती, ज्यात त्याने केलेली दुष्कर्मे आपण वाचनातून, मालिकांमधून अथवा सिनेमांमधून पाहिली असतील. पण रावणाच्या फक्त एका गुणाचा संदर्भ मी इथे देईन तो म्हणजे “निस्सीम भक्ती” ज्याची प्रशंसा श्री रामांनीही केल्याचा उल्लेख आहे. रावण हा दैत्यांचा राजा, तसेच क्रूर राज्यकर्ता होता पण तसाच तो श्री देव शिवशंकराचा निस्सीम भक्त होता. शंकरदेवांनीही रावणाला त्याच्या ह्या भक्तीला प्रसन्न होऊन काही वरदान दिले होते. तर मुद्दा हा आहे कि वाईट लोकांकडून हि चांगले गुण घेण्याचा अथवा चांगले शिकण्याचा, म्हणून रावणाकडून त्याची भक्ती करण्याची प्रबळ इच्छाशक्ती हा एक गुण म्हणून त्याकडे पहा. भले त्याने त्या भक्तीतून मिळालेल्या शक्तीचा दुरुपयोग केला व त्याचे परिणामही स्वीकारले.
मी इथे उल्लेख करणार नव्हतो पण राहवलं नाही, वर्तमान परिस्थिती मध्ये म्हणजेच नोकरीमधली बढती मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेली धडपड. हि धडपड आपण सर्वांनी पाहिली वा अनुभवलीही असेल. नोकरीमध्ये बढतीसाठी काही लोक बऱ्याच चांगल्या तसेच चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतात आणि स्वाभाविक आहे कारण सर्वाना पुढे जाण्याची घाई. आपल्याला वाईट वाटणाऱ्या गोष्टी एखाद्या माणसाची कला असू शकते जी सर्वांकडे नसते आणि उगाच आपण त्यांच्या नावाने खडे फोडत बसतो. इथे बघा, तुम्ही ह्या परिस्थीशी जुळवून घेणं आणि ते गुण आत्मसात करणेही महत्वाचं आहे, मी तर म्हणेन हि काळाची गरज आहे.
चला आता वाईट स्वभाव झाले आता वाईट परिस्थिती बघू या – कोरोना. हा आत्ताच सर्वात चर्चेचा, राजकीय घडामोडींचा, आणि सर्वात महत्वाचे त्याच्यामुळे झालेल्या दुष्परिणामांचा रोज घेतला जाणारा आढावा, अगदी सर्वसामान्यांपासून. ह्या कोरोनाने वेगवेगळ्या स्तरावर दुष्परिणाम केले आहेत उदा. वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, नोकरी-व्यवसाय ई. आता तुम्ही म्हणाल ह्यातून चांगलं काय शिकायचं आणि काय चांगलं झालं तर मला उलगडलेल्या गोष्टी सांगेन. पाहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वच्छतेचं महत्व जे आपल्याला आपल्या घरातल्या म्हणजे आई-वडील ते देशातील अनेक थोर व्यक्तींनी सांगितले आहे पण आपण त्यात कितपत खरे उतरलो हे उघड सत्य आहे. पण कोरोनाच्या काय तर कोरोनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांच्या अर्थात मृत्यूच्या भीतीने का होईना आपल्याला स्वच्छतेचे महत्व कळलेलं आहे आणि बऱ्याच अंशी अवलंब होताना दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सवयी बदलल्या, जिथे आपण उघड्यावर थुंकणे, शौच क्रिया, स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, व्यायामाचे महत्व, दिनचर्या सांभाळणं, इतरांची विचारपूस करणं (जे कमी होत चाललं आहे) इत्यादी. गोष्टीवर लक्ष केंद्रित झालं. तिसरी गोष्ट म्हणाल तर आर्थिक नियोजनाची गरज सर्वच स्तरातील लोकांना पटली आहे. कोरोना सारखी परिस्थिती कधीही सांगून येत नाही आणि जर आली तर सावरण्याचा वेळ हि देत नाही हे आता लोकांच्या लक्षात आले आहे.
कोरोनामुळे सरकारने दिलेली एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ज्याचा संदर्भ पूर्णपणे ह्या लेखाशी नसला तरी त्याचा फायदा आपण घेतला असेल वा ज्यांना माहित नाही त्यांनी घ्यावा हि आशा बाळगतो. सरकारने २ गोष्टी दिल्या आहेत, त्यांना ज्यांनी आपल्या घराचे स्वप्न पहिले आहे किंवा पूर्णत्वाला आहे. पहिले तर गृहकर्जावरच्या व्याजदरात खूप मोठी कपात झाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन वा पुनर्विक्रीतून घेणाऱ्या घरांवरचे मुद्रांक शुल्क कमी करण्यात आलेले आहे (येत्या मार्च २०२१ पर्यंत मुभा आहे) ज्याचा फायदा तुम्ही लवकरात लवकर घ्यावा हि विनंती.
थोडक्यात काय तर चांगले काय आणि वाईट काय, दोन्ही मध्ये काही ना काही शिकण्यासारखे असतं. हे आत्मसात करणे हि एक कला आहे जी सर्वांना जमत नाही पण माझी इच्छा आहे कि ते तुम्ही ह्या पुढच्या काळात शिका आणि अनुभव घ्या. यशस्वी माणूस जरी वाईट असला तरी पण तो आज यशस्वी आहे आणि तो त्याच्या कुठल्या गुणांमुळे झाला असेल त्याचा विचार करा. वाईट म्हणण्यात किंवा त्याला दुर्लक्षित करण्यात समाधानी नका होऊ, त्यात तुमचे नुकसान असं म्हणता येणार नाही पण त्रास जरूर होईल.
संक्षिप्तपणे सांगायचे झाले तर एवढेच सांगेन कि वाईटातूनही चांगले काही घेण्याचा प्रयत्न करा.
माझे म्हणणं सर्वांनाच आवडेल असे नाही म्हणून मी पण एवढंच सांगेन, पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून.
आणि जर खरंच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचावा.
धन्यवाद.