कोरोनाकाळातील पहिली दिवाळी

कोरोनाकाळातील पहिली दिवाळी
आपण आत्तापर्यंत म्हणजे मार्च २०२० ते आज तारखेपर्यंत (ऑक्टोबर २०२०), कुठल्याही लस वा औषधाविना कोरोनाचा सामना केला आहे तसाच त्याच्यावरील उपचार आल्यावरही करावा लागणार आहे, हे मनाशी पक्क करा. आत्तापर्यंत आपण अनेक सण-उत्सव ह्या कोरोना काळात साजरे केले तेही सरकारने आखून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक (सोशल डिस्टंसिन्ग आणि स्वच्छतेचे नियम वगैरे) नियम पाळून, विशेष म्हणजे त्यात गणपती सारखा सर्वांचा लाडक्या सार्वजनिक सणाचा हि समावेश होता. आपण आता ह्या सवयींशी मिळते-जुळते घ्यायला शिकलो आहे आणि येणारे सण-उत्सव हि असेच साजरे करावे लागणार, त्याला काही पर्याय नाही.
नमस्कार वाचक मित्रांनो. तुम्ही आत्तापर्यंत दाखविलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद कारण मी लिहिलेले लेख तुम्ही आवडीने वाचता आणि प्रामाणिक प्रतिक्रियाही देता. आत्तापर्यंत कोरोना ह्या विषयावर माझे व इतरांचे अनेक लेख वाचले असतील, तरीही मी आज कोरोनावरचा आणखी एक लेख सादर करीत आहे व पुढे अजूनही येतील कारण विषयच तसा आहे.
चला आता विषयाकडे वळूया. विषय वाचून थक्क झाला असाल वा धक्काही बसला असेल. तुम्हाला वाटत असेल कि हा पाहुणा अर्थात कोरोना जाणार नाही कि काय? हो, तो कायमचा जाणे हे आतातरी शक्य नाही असेच वाटते आणि सरकारच्या काही ब्रीदवाक्य आणि उपक्रमांवरून हेच सिद्ध होते. तसेही असे अनेक साथीचे रोग आले, आणि इथलेच बनून राहिले, उदा. स्वाईन फ्लू, प्लेग, बर्ड-फ्लू असे अनेक आले, आपण त्यांच्या साथीने जगायला शिकलो आणि त्यांच्याशी लढायला हि. कोरोना वर लस व औषध येईलही पण तो कायमचा जाईल हे आता शक्य नाही आणि त्याच्यावर उपचार येईपर्यंत स्वतःला सांभाळणे हेच फक्त आपल्या हातात आहे. अशा उदाहरणांवरून असंच सिद्ध होते कि जे नवीन रोग येतात त्यांचे औषध जरी उपलब्ध झाले तरीही त्यांचा मुळापासून नायनाट करणे अद्यापि तरी शक्य झालेले नाही. ह्याचा असाही अर्थ होतो कि आपल्याला अशा रोगांबरोबर जगण्याची कला अवगत आहे वा सवय होऊन गेली आहे आणि आपण आतापर्यंत कोरोनाला हि स्वीकारले आहे, ते अनलॉकच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. आपण कोरोनाला हरवू शकतो याचा अर्थ असा नाही कि त्याला मारू शकतो, फक्त त्याचे प्रमाण कमी करू शकतो. हुश्श, कोरोनाची वाहवा व विश्लेषण बस झाले असं वाटतं कारण मूळ मुद्दा बाजूला राहत आहे.
ह्या कोरोना रोगाची एवढी दहशत आहे कि माणसे माणसाला परकी झाली आहेत. असे दिसून आले आहे कि एखादा व्यक्ती कोरोनाग्रस्त झाला तर त्याला वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळू लागते. नियम तर इतके कठोर आहेत कि कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम दर्शनही त्यांच्या नातेवाईकांना घेता येत नाही, हि भयाण वस्तुस्थिती आहे. माझं एवढंच म्हणणं आहे कि काळजी व जबाबदारी घेऊन कोरोनावर मात करता येते हे उघड आहे, त्याचबरोबर नाती आणि सण-उत्सव हि जपता येतील हे लक्षात ठेवा, ज्यासाठी वैद्यकीय यंत्रणा व सरकार दिवसरात्र राबून कोरोनावर उपाययोजना करत आहेत.
माणुसकी जपून सण-उत्सव साजरे करा आणि सर्वांपुढे आदर्श ठेवा.
आणि जर खरंच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचावा.
धन्यवाद.