Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

मुंगीवरून जगप्रवास

मुंगीवरून जगप्रवास

"मुंगीवरून जगप्रवास", एवढाच विषय वाचला तर विषयाची कल्पना करता येणार नाही कारण बरेचसे वाचक शब्दशः अर्थ काढून हसलेही असतील, पण कल्पना करा खरंच हे शक्य झाले तर? होय, हे शक्य आहे आणि ते कोणामुळे तर - "कल्पना". कल्पना हे कुठल्याही मुलीचे नाव नाही तर ती आहे आपली "कल्पनाशक्ती". आता तुम्हाला हळूहळू कोडं उलगडू लागलं असेल, हो ना?

नमस्कार वाचक मित्रहो. आज तुमच्यासमोर एक सर्वपरिचित आणि मजेशीर विषय नव्याने मांडणार आहे. लेखाचे नाव वाचून विषयामागचा आशय समजला नसेलच म्हणून विविध क्षेत्रांमधील उदाहरणांमधून मी तो पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नेहमीसारखीच प्रतिक्रियांची प्रतीक्षा राहील.

“मुंगीवरून जगप्रवास”, एवढाच विषय वाचला तर विषयाची कल्पना करता येणार नाही कारण बरेचसे वाचक शब्दशः अर्थ काढून हसलेही असतील, पण कल्पना करा खरंच हे शक्य झाले तर? होय, हे शक्य आहे आणि ते कोणामुळे तर – “कल्पना”. कल्पना हे कुठल्याही मुलीचे नाव नाही तर ती आहे आपली “कल्पनाशक्ती”. आता तुम्हाला हळूहळू कोडं उलगडू लागलं असेल, हो ना?
लहान असतांना, किंबहुना कॉलेज शिक्षण होईपर्यंत मी आणि घरातले सर्वच, आमच्या वडिलांकडून एक वाक्य नेहमी ऐकायचो, ते म्हणजे – “आयडिया असेल तर मुंगीवरूनही जगप्रवास करता येतो”. त्यावेळी हे वाक्य ऐकून फार गंमत वाटायची, आम्ही सर्वजण मजेत हसायचोही, पण त्यामागचे गूढ हळूहळू उकलत गेले आणि आज ते मी तुमच्यासमोर ह्या लेखाद्वारे मांडत आहे. हे वाक्य माझे वडील काही उगाच नाही बोलायचे तर जेव्हा जेव्हा मी काही नवीन गोष्टी करायचो जसे कि टाकाऊ पासून टिकाऊ, किंवा काही कलात्मक गोष्ट करायचो, भले ती कितीही साधी वा छोटी का असेना, मला त्या एका वाक्यातून प्रेरणा मिळायची. म्हणून मी ह्या विषयाला “प्रेरणादायी” अशी हि उपमा देईन, कारण हे वाक्य आणि त्यामागचा उद्देश्य माझ्या मनात कोरला गेला आहे आणि आयुष्यभर मला प्रेरणा देत राहील.
प्रथम आपण कळीच्या क्षेत्राकडे पाहूया, ते म्हणजे राजकीय क्षेत्र. मी इथे कोणत्याही राजकीय पक्ष वा व्यक्तीचे नाव न घेता माझा मुद्दा स्पष्ट करणार आहे, बाकी वाचक सज्ञान आहेतच. आजकालच्या पिढीला राजकीय बातम्या, उलाढाली व मुद्दे फार लवकर कळतात, त्याचे कारण म्हणजे प्रगल्भ वृत्तवाहिन्या, सामाजिक माध्यमे ई. परंतु जुन्या काळात वृत्तपत्रांशिवाय व मोजक्या वृत्तवाहिन्यांवरील ठराविक वेळ सोडली तर बातम्या कळायला फारसा वाव नसायचा. सध्या तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे कि समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाला वा राजकीय व्यक्तींना एकमेकांपर्यंत पोहोचायला फारशी धडपड करावी लागत नाही. याचा पुरेपूर अनुभव गेल्या काही ५-१० वर्षांच्या कालावधीत लोकांच्या प्रत्ययास आला असेल. सांगायचा मुद्दा काय तर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ह्याच सामाजिक माध्यमांचा कलात्मकरीत्या वापर करून विविध राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी बरेच काही साध्य केले आहे याला दुमत नसावे. ह्या चाणाक्ष वा कल्पकतेला म्हणतात कल्पनाशक्ती आणि त्या बळावर साध्य केलेला विजय, प्रगती वा अन्य काही गोष्टी, ज्याला ह्या लेखामध्ये “मुंगीवरून जगप्रवास” असे संबोधले आहे.
दुसरं उदाहरण म्हणजे माहिती तंत्रज्ञान. जसं मी पहिल्या उदाहरणामध्ये स्पष्ट केले कि काही सुविधांअभावी आपल्याला राजकीय किंवा सामाजिक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचायला वा समजायला वेळ लागत असे, त्याच प्रमाणे मागच्या काही काळात माणसांना एकमेकांशी संपर्क किंवा संवाद साधणे, हि फार अवघड गोष्ट असायची. या गोष्टींचा पाठपुरावा घेण्यासाठी मी काही जुन्या माध्यमांची आठवण करून देतो, जसे कि पत्रव्यवहार, अति-महत्वाचा संदेश असेल तर पोस्टाची तार, वृत्तपत्र, दूरध्वनीसंच (जो सर्वांकडे उपलब्ध नसायचा) ई. आणि ह्या माध्यमांमध्ये हळूहळू प्रगती होत गेली, तंत्रज्ञान विकसित झाले. अलीकडच्या काळात आपण पाहतोय कि माहिती तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे कि बऱ्याच गोष्टी स्वयंचलित झाल्या आहेत. याच माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर आता जग हि तोकडे वाटू लागले आहे, बऱ्याच गोष्टी जवळ वाटू लागल्या आहेत, उदा. मी जास्त लांब जात नाही, हल्लीच्या म्हणजे दूरध्वनीसंचाच्या काळात एखादा माणूस जर सकाळी घरातून बाहेर पडला कि संध्याकाळी घरी येईपर्यंत किंवा बाहेर गेलेल्या त्या व्यक्तीचा घरी दूरध्वनी आल्याशिवाय, त्याची खुशाली कळत नसे. त्याउलट हल्ली एखादा व्यक्ती (उदा. विवाहित च घ्या) घरी यायला १० मिनिटे जरी उशीर झाला तरी घरून (अर्थात पत्नीचा) भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईलवर फोन येतो आणि खात्री केली जाते, म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली आहे. बऱ्याच महिला हे वाचून हसल्या – रागावल्या असतील आणि पुरुषमंडळी नेहमीसारखी मनातल्या मनात आनंदी झाले असतील. मजेचा भाग सोडला तर एकमेकांशी संपर्क करणे फारच सोपे आणि सोयीचे झाले आहे. माहितीतंत्रज्ञानाचे बरेच फायदे झाले आहेत, त्यापैकी जसं म्हंटल्याप्रमाणे जग तोकडे झाले आहे, याचे उदाहरण म्हणजे आता आपल्याला जगातील कुठल्याही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, हजारो किलोमीटर अंतरावर देखील थेट संपर्क करू शकतो, एव्हाना विडिओ कॉलद्वारे पाहूही शकता.
अशा प्रकारे आपण बाकीच्या अनेक क्षेत्रांमध्ये या गोष्टींचे विश्लेषण पाहू शकता. एक छोटंसं उदाहरण सांगतो, जे तुम्हाला पटेल परंतु ह्यामध्ये कोणताही देशप्रेमाचा दाखला देऊन वाद निर्माण होऊ नये हि विनंती, फक्त त्या मागचा हेतू लक्षात घ्यावा. तर उदाहरण आहे – “चायनीज वस्तू”. आपण बरीच वर्षे किंबहुना आतापर्यंत या चायनीज वस्तू वापरत असू. आपण याचा विचार केला तर आपल्याला प्रथमक्षणी निदर्शनास येते ती त्या वस्तूंची किंमत. मी यापुढे जाऊन दोन महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. यात पहिली सांगू इच्छितो ती म्हणजे त्यांनी वापरलेली कल्पनाशक्ती व दुसरी म्हणजे स्पर्धा टिकवून वापरकर्त्यांची आवड निवड जपणे. आता सांगितलेल्या दोन गोष्टींमधील पहिली गोष्ट – कल्पनाशक्ती जी तुम्हाला त्यांनी बनवलेल्या खेळण्यांमध्ये दिसून येते, तर दुसरी गोष्ट जी त्यांनी अचूक हेरली आहे ती म्हणजे या स्पर्धात्मक युगात वापरकर्त्यांची आवड निवड ओळखून बनवणे आणि तीही इतरांपेक्षा कमी दरात. या धावपळीमध्ये ते एका गुणाला कमी पडतात ते म्हणजे गुणवत्ता, पण तरीही ते स्पर्धेत टिकून राहतात. पण मूळ मुद्दा दृष्टीआड करता येणार नाही
एव्हाना आतापर्यंत “मुंगीवरून जगप्रवास” कसा करता येईल व “आयडिया (कल्पनाशक्ती) असेल तर मुंगीवरूनही जगप्रवास करता येतो” ह्या वाक्याची प्रचिती आली असेल. या सर्व माध्यमातून व दिलेल्या उदाहरणांमधून सिद्ध होते कि प्रत्येक बदलामागे असते प्रगती आणि प्रगतीच्या मागे असते ती म्हणजे “कल्पनाशक्ती”, ज्याचा आपण पुरेपूर व कल्पकतेने वापर करून जग जिंकू शकतो.
जाता जाता मला एक जाहिरात आठवली – IDEA कंपनीची, ज्यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन एक वाक्य बोलताना दिसायचा – NO IDEA – GET IDEA , इथे भले त्या कंपनीची जाहिरात असेल परंतु कंपनीचे नाव व त्यामागील मराठी अर्थ शेवटी तोच – कल्पनाशक्ती. म्हणून सांगतो, कधीही हार मानू नका आणि आपली कल्पनाशक्ती वापरा आणि आयुष्यात पुढे जात रहा
जर हा लेख मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत नक्कीच पोहोचावा ही विनंती.
आपला,
विनोद चारी
९९८७० ३०९७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *