Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

मागे वळून पाहतांना

मागे वळून पाहतांना

विषयात बऱ्याच वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, भावनिक, व्यावहारिक तसेच अनेक वैचारिक पहलु दडले आहेत. सदर लेख हा प्रत्येक वय वर्गांसाठी आहे. आयुष्यात मागे वळून पाहतांना काही खंत राहू नये याचा ह्या लेखाद्वारे प्रयत्न. #आयुष्यात मागे वळून पाहताना #वयाच्या प्रवासात #जीवनप्रवास #LookingBackInLife

नमस्कार वाचक मित्रहो. आजचा विषय वाचतांना जरी गंमतीशीर वाटत असला तरी त्यामागे बऱ्याच वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, भावनिक, व्यावहारिक तसेच अनेक वैचारिक पहलु दडले आहेत, ज्यांचा उलगडा माझ्या वैयक्तिक विचारांतून व काही तपशिलांद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सदर लेख हा प्रत्येक वय वर्गांसाठी आहे तसेच ते यातील बऱ्याच गोष्टींचा साधर्म्य वैयक्तिक अनुभवांबरोबर अनुभवू शकतील, याची खात्री वाटते. “मागे वळून पाहतांना” याचे सरळ अर्थी विश्लेषण म्हणजे “आयुष्यात मागे वळून पाहताना” असा आहे, पण हे सांगितले म्हणजे मित्रांनो विषय इथे संपत नाही तर इथून सुरु होतो, अर्थात विषयाला साजेसे मला जे मांडायचे आहे ते आपण पुढे पाहूया.

प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वसाधारणपणे तीनच टप्पे येतात, ते म्हणजे बालपण, तारुण्य व म्हातारपण. सर्वात पहिले येते ते बालपण आणि हे पूर्णतः परावलंबी असते कारण या महत्वाच्या टप्प्यात आपले जीवन हे एका मातीच्या गोळ्याप्रमाणे असते, त्याला जसे घडवावे तसे घडते. बालपण हे संस्कार व शिक्षण याचा एक अभ्यासमय प्रवास असतो, ज्यामध्ये आपले आई-वडील, शिक्षक, मित्र मंडळी व कौटुंबिक परिस्थिती यांचा मोठा वाटा असतो व अनावधानाने घडलेल्या लहान-मोठ्या चुका वयाच्या आडोशात लपून जातात, परंतु बालपणांत घडलेल्या वळणदार प्रवासाचे चांगले वाईट बदल पुढील टप्प्यामध्ये दिसून येतात.

बालपण हा आयुष्याचा सुंदर व हवाहवासा वाटणारा टप्पा आहे, पण त्यानंतर सुरु होणारा तारुण्याचा प्रवास हा आपल्याला व्यवहारिक जगतात घेऊन जातो. लक्षात घेण्याचा मुद्दा असा कि बालपणाप्रमाणे हा टप्पा पूर्णपणे परावलंबी नसून बरेचसे निर्णय आपल्याला स्वतःला घ्यावे लागतात, त्यामुळे उच्च शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न, तसेच कौटुंबिक जबाबदारी अशा विविध महत्वपूर्ण विषयांना हाताळताना घेतले जाणारे निर्णय निर्णायक ठरतात. परंतु जर आपला पाया अर्थात संस्कार व शिक्षणाची शिदोरी भक्कम असेल तर वरील सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्याकडून वैयक्तिक, कौटुंबिक वा सामाजिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, हे नक्की.
सर्वसाधारणपणे, आयुष्यातील तिसरा टप्पा म्हणजे म्हातारपण व ते वयोमानात न मोजता आपल्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यावर आयुष्याची गोळा बेरीज करण्याचा हा काळ समजला जातो. पण मला असे अजिबात वाटत नाही, तर प्रत्येकाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वा गरजेनुसार आपल्या भूतकाळातील प्रवासाचा आढावा घेणे गरजेचे आहे व वेळेतच त्यातील उणिवा तसेच घडलेल्या चुकांचे निरसन करणे आवश्यक आहे. असे केल्याने म्हातारपणांत गोळा बेरजेच्या ताणातून मुक्तता मिळून उर्वरित आयुष्याचा आनंद उपभोगता येईल, नाही का?
मित्रांनो, आयुष्यात आपल्या सर्वच आशा आकांक्षा पूर्ण होतील असे नाही, उणिवा तर राहतील, जमलंच तर पूर्ण करा, परंतु चुकांना अजिबात थारा देऊ नका, कारण उणिवा एकवेळ भरून निघतील, पण चुका व त्यांचे परिणाम पूर्णपणे पुसले जाऊ शकणार नाहीत. तसेच आयुष्यात मागे वळून पाहतांना मनाला मानसिक समाधान लाभले पाहिजे, व भूतकाळातील टप्प्यांवर केलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचा आपल्याला तसेच आपल्या आप्तेष्टांना पश्चात्ताप वाटू नये, हे कायम लक्षात ठेवावे.
वाचकांनी सध्याच्या वयोगटाचा विचार करता आपल्या आयुष्याचा टप्पा ओळखावा व काही उणिवा राहिल्या असतील तर पूर्ण करायचा प्रयत्न करा वा काही चुका घडल्या असतील तर वेळेतच सावरावे, तसेच वर्तमानात जुन्या-नवीन चुकांची पुनरावृत्ती करण्याचे टाळावे व पुढील वाटचाल आदर्शवत करावे, अशी आशा बाळगतो.

वाचकांनी सध्याच्या वयोगटाचा विचार करता आपल्या आयुष्याचा टप्पा ओळखावा व काही उणिवा राहिल्या असतील तर पूर्ण करायचा प्रयत्न करा वा काही चुका घडल्या असतील तर वेळेतच सावरावे, तसेच वर्तमानात जुन्या-नवीन चुकांची पुनरावृत्ती करण्याचे टाळावे व पुढील वाटचाल आदर्शवत करावे, अशी आशा बाळगतो.

आजच्या लेखाचा संदर्भ कोणत्याही प्रकारे आध्यात्मिक प्रवचनाशी जोडला जाऊ नये हि विनंती, कारण वरील सर्व विचार हे वैयक्तिक व अनुभवातून आलेले आहेत, जे आपल्या समोर मांडण्याचे धाडस केले आहे.
जर हा लेख खरंच मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचावा हि विनंती.
#आयुष्यात मागे वळून पाहताना #वयाच्या प्रवासात #समाज मनासंबंधी #जीवनप्रवास #माझंआयुष्य #मराठीब्लॉग #प्रेरणादायक #LookingBackInLife #LifeReflections #LifeJourney #LifeLessons #LifeStory #InspiringJourney #ReflectingOnLife #SelfDiscovery #ThoughtsOnLife

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *