Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

भारतासमोर ऑलिम्पिक स्पर्धेची आव्हाने

भारतासमोर ऑलिम्पिक स्पर्धेची आव्हाने

ऑलम्पिक खेळ हे जगातील सर्वात प्रतिष्ठित व आव्हानात्मक स्पर्धा आहे. आव्हान वाटण्यामागील प्रमुख कारण म्हणजे ऑलम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांच्या पायाभूत सुविधांचा अभाव ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रे व तज्ज्ञ प्रशिक्षकांची कमतरता यांचा समावेश करता येईल, यामुळे गुणवत्ता असूनही भारतीय खेळाडूंना उच्चस्तरीय सुविधा, अद्ययावत उपकरणे तसेच योग्य प्रशिक्षण मिळवणे कठीण होऊन बसले आहे. ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पदकांची कमाई करून उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणे महत्वाचे आहे. #OlympicChallengesIndia #IndiaAtTheOlympics #OlympicJourneyIndia

आपला भारत देश दक्षिण आशियामधील एक विविधतेने आणि सांस्कृतिक परंपरेने नटलेला समृद्ध देश आहे. त्याचप्रमाणे विविध भाषा, संस्कृती तसेच परंपरांमुळे भारताची एक लक्षणीय ओळख वैश्विक स्तरावर झाली आहे. भारताच्या विविधतेमध्ये प्रामुख्याने त्याची तटस्थ भौगोलिक रचना, भाषा, संस्कृती, मजबूत आर्थिक स्थिती, खाद्यसंस्कृती, राजकीय व्यवस्था अर्थात लोकशाही व पर्यावरणाचे वरदान इत्यादींचा समावेश आहे. भारत सर्वच आघाड्यांवर प्रगती करत असतांना ऑलिम्पिक स्पर्धेचे आव्हान पेलताना का डगमगतो हा सर्वच भारतीयांना सध्या भेडसावत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वर्षागणिक आपल्या पदकांची कमाईमध्ये कणाकणाने वाढ होतांना दिसत असली तरी इतर देशांच्या तुलनेत भारत फारच पिछाडीवर आहे, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येइतकी आकडेवारी असलेले देश देखील सुवर्ण पदकांसहित अनेक पदकांची दिमाखदार कामे करतांना दिसतात, उलट अर्थी आपला भारत कांस्य पदकही सुवर्ण पदकापेक्षा दिमाखाने मिरवतांना दिसतो. पदक कोणतेही असो, विजय साजरा करणे म्हणजे विजयी खेळाडूचे मनोबल उंचावत असतो, पण खरंच इतके पुरेसे आहे कि पदकांची संख्या वाढविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि भारताला ऑलिम्पिक स्पर्धेचे आव्हान का वाटावे? भारताला ऑलिम्पिक स्पर्धेचे आव्हान वाटण्यामागील कारणे व त्यावर मात करण्यायोग्य उपायांबद्दल देखील संक्षिप्तपणे विचार मांडले जाणार आहेत.
ऑलिम्पिक खेळ हे जगातील सर्वात प्रतिष्ठित व आव्हानात्मक स्पर्धा आहे. आव्हान वाटण्यामागील प्रमुख कारण म्हणजे ऑलिम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांच्या पायाभूत सुविधांचा अभाव ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रे व तज्ज्ञ प्रशिक्षकांची कमतरता यांचा समावेश करता येईल, यामुळे गुणवत्ता असूनही भारतीय खेळाडूंना उच्चस्तरीय सुविधा, अद्ययावत उपकरणे तसेच योग्य प्रशिक्षण मिळवणे कठीण होऊन बसले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदकांची कमाई करून उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणे महत्वाचे आहे.
तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या उप्लब्धतेबरोबरच त्यांची योग्य निवड तसेच प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण पद्धतीचे मूल्यांकन व त्यांना अद्ययावत माहितीचा पुरवठा होत राहणे देखील महत्वाचा भाग आहे. प्रशिक्षणाबरोबरच खेळाडूंच्या आहार व शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अनेक प्रकारच्या खेळांचा सहभाग आहे, अर्थात जेवढे खेळ तितक्या प्रकारातील शारीरिक तयारी खेळाडूंकडून होणे भाग आहे, त्यामुळे आहारातही त्याप्रमाणे बदल होत जातो. अशा विविध आहारतज्ञांची निवड व उपलब्धता असणे आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्ती बरोबर मानसिक तयारी देखील एका खेळाडूला यशस्वी करण्यासाठी तितकीच महत्वाची असते, कारण स्पर्धा म्हंटली कि कोणत्याही उत्कृष्ट खेळाडूला थोडेतरी मानसिक दडपण हे येतेच, त्यात ऑलिम्पिक सारख्या जागतिक प्रसिद्धी असलेल्या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना किती मानसिक दडपण येत असेल याचा विचार करता आहारतज्ज्ञांबरोबर मानसिक तज्ज्ञांचा देखील खेळाडूंना पाठिंबा मिळाला पाहिजे. याचप्रमाणे भारतीय वातावरणासारखेच बाहेरील देशांतील वातावरणासोबत मिळतेजुळते घेऊन आपल्या खेळाडूंना उत्तम प्रदर्शन कसे करता येईल याचाही सहभाग असावा.
ऑलिम्पिक मधील भारताच्या सहभागाच्या सुरुवातीच्या काळात पूर्व भारतीय खेळाडूंनी प्रतिकूल वातावरणांत घेतलेल्या अथक मेहनतीचे दाखले व गौरव गाथा ऐकवून खेळाडूंचे मनोधैर्य न वाढवता विविध स्पर्धांसाठी असणारी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे, प्रशिक्षण व आहार देण्याकडे कल असला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या सबळ असणाऱ्या खेळाडूंसोबतच गुणवत्ता धारक पण आर्थिक पाठबळ कमी असलेल्या खेळाडूंसाठी सरकारी अनुदान व प्रायोजिकत्व सारखी योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे, त्यासाठी आपल्या देशात ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तर खेळाडूंचे स्पर्धात्मक दडपण कमी होऊन मनोबल वाढण्यास मदत होईल तसेच क्रीडा क्षेत्रातील आर्थिक गुंतवणूक वाढली पाहिजे.
आतापर्यंत मांडण्यात आलेली कारणे व त्यावर करण्यात येऊ शकलेल्या उपाय योजनांबद्दल आपण पाहिले, परंतु आपल्याला वाटत नाही का कि या सर्व गोष्टींवर कित्येक वर्षांपासून चर्चा होत आल्या आहेत व आश्वासनांमधून खेळाडूंचे मनोबल वाढविण्याचा व भारतीय जनतेच्या भावनेला काळजीची फुंकर घालण्यात येत आहे. हि सर्व कारणे म्हणजे पुस्तकी ज्ञान आहे व उपाय देखील पुस्तकी ज्ञानाप्रमाणे हवेत विरून गेल्याने वर्षानुवर्षे याच विषयावर चर्चा करण्यापुरते आपल्याकडे काही उरत नाही
विषयात मांडलेल्या प्रश्नांची व त्यावर उपाय करण्याची चिंता खरंच आपल्यासारखी क्रीडासंबंधित अधिकारी व राजकीय मंडळींना असेल तर पारंपरिक पद्धत सोडून चौकटीबाहेर जाऊन व्यावहारिक विचार करणें हा एक च उपाय दिसत आहे, त्यासाठी भले आपल्याला बाहेरील देशांच्या खिलाडूवृत्तीचा तसेच स्पर्धात्मक तयारीचा अभ्यास करणें भाग आहे व त्यात कमीपणा वाटू नये. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असून ऑलिम्पिकमधील भारतीय पुरुष हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी वाखाणण्याजोगी आहे कारण आतापर्यंत त्यांनी ८ सुवर्ण पादकांसहित एकूण १२ पदके जिंकली आहेत. परंतु शेवटचे सुवर्णपदक १९८० मध्ये जिंकले, त्यानंतर ४० वर्षांच्या वनवासानंतर २०२० साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करता आली. या वरून हे सिद्ध होते कि भारतात गुणवत्तेची कमी नाही व ऑलिम्पिक मधील कामगिरी देखील उत्तम आहे तरीही पदकांची कमाई व सातत्य राखण्यात मात्र भारत अपयशी ठरत आहे.
हॉकीच्या उदाहरणांतून एक सिद्ध होते कि राष्ट्रीय खेळाची अशी परिस्थिती असतांना बाकी खेळांकडून आपण दमदार कामगिरीची अपेक्षा कशी ठेऊ शकतो. भारतात सर्वच स्तरावर वाढता राजकीय हस्तक्षेप हि सर्वात मोठी चिंतेची बाब आहे व प्रमुख कारण असल्याचे पुढील विश्लेषणांतून आपल्याला लक्षात येईल. इतर देशांप्रमाणे खेळाला युद्धस्तरीय दर्जा दिला गेला पाहिजे कारण प्रत्येक खेळाद्वारे खेळाडू ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत असतो व मिळालेले यश अपयश हे वैयक्तिक नसून राष्ट्रीय असते. आधी नमूद केल्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणूक वाढायला हवी व त्यामध्ये प्रत्येक खेळाला समान वागणूक मिळणे आवश्यक आहे, परंतु तसे होतांना दिसत नाही. याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रीय खेळापेक्षा क्रिकेटच्या खेळाला मिळणारा वाढता राजाश्रय व प्रसिद्धी, परिणामी प्रेक्षकांचे व खेळाडूंचा देखील इतर खेळांपेक्षा क्रिकेट कडे कल वाढला आहे. खेळांमधून मिळणारे समाधान, संस्कृतीची जपणूक, देशाची जागतिक प्रसिद्धी, देशांतर्गत मैत्रीची वृद्धी इत्यादी महत्वाच्या घटकांपेक्षा त्यांतून मिळणारे उत्पन्न हि आयोजक व राजकीय प्रवृत्ती मोडून निघणे गरजेचे आहे. ऑलिम्पिक मध्ये खेळले जाणारे बरेचसे खेळ सामान्य जनतेला माहीतही नसावेत, कारण खेळांचे महत्व जपण्यापेक्षा त्याचे व्यावसायिकीकरण करून उत्पन्न कसे कमावता येईल याकडे जास्त लक्ष दिला जात आहे हि भारतासाठी खेदाची बाब आहे. खेळामध्ये तर भेदभाव होतच आला आहे त्याचबरोबर अलीकडे प्रकाशझोतात आलेली बाब म्हणजे देशासाठी खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या खेळाडूंसाठी देण्यात येत असलेल्या निधीबाबाबत राज्यस्तरीय भेदभाव करण्यात आला. अशी सर्व देशांतर्गत परिस्थिती असतांना आपण खेळाडूंकडून का अपेक्षा करत आहोत, खरंतर अपेक्षा खेळाला जागतिक दर्जा देण्याची जबाबदारी असणाऱ्या संबंधितांकडून व्हायला हवी. विषयांत मांडलेली व्यथा अर्थात भारतासमोर ऑलिम्पिक स्पर्धेची आव्हाने संपुष्टात आणायची असल्यास खेळाला लष्कराप्रमाणे दर्जा व संरक्षण मिळायला हवे कारण खेळाडू जागतिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये युद्धावर तैनात असलेल्या एका सैनिकाप्रमाणे देशाचे प्रतिनिधित्व करत असतो.
विषयाला आधारित वरील सर्व घटकांचा सारांश काढता एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे घरातील सर्व कुटुंबीय एकत्र असतील तरच ते कुटुंब बाहेरील शत्रूंशी पूर्ण ताकतीनिशी लढू शकतो आणि जिंकूदेखील शकतो, अथवा सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. हीच बाब जर क्रीडा संबंधितांना समजली तरच भारत ऑलिम्पिकच काय तर कोणत्याही स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकेल, असा ठाम विश्वास वाटतो. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *