Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

फॅशनची दुनिया

फॅशनची दुनिया

लहानपणी जे केलं ती निरागसता होती पण सध्या जे निदर्शनास येते त्याला काय म्हणावे हे तुम्हीच ठरवा आणि कळवा. चला स्पष्टच सांगतो. लहानपणी जसे फॅशन म्हणून धागेदोरे वा साखळ्या घालणे प्रकार चालायचे तसे काहीसे मोठ्या माणसांकडून सर्रास होताना दिसते. उदा. मनगटाला धागेदोरे बांधणे, कपाळावर मोठा टिळा लावून मिरवणे, फॅशन म्हणून कानात बिगबाळी, देव-दर्शन किंवा तीर्थक्षेत्राला एक सहल म्हणून फेरफटका, कौटुंबिक सोहळ्यांचे सार्वजनिक प्रदर्शन, आणि बरेच काही.

नमस्कार मित्रांनो. खूप दिवसांनी तुमच्यासमोर एक लेख आणला आहे आणि हा हि तुमच्या पसंतीस उतरेल हि आशा. या लेखातून मी एक असा विषय मांडत आहे ज्यावर तुम्ही नक्की विचार कराल व आचरणात आणा
आधीच्या एका लेखात मी माणसांच्या असलेल्या विभिन्न स्वभावांचा संदर्भ देऊन एक महत्वाचा विषय मांडला होता – “वाईटातून चांगल्याची निवड”, ज्याला तुम्ही चांगली पसंती दर्शविली. आज मी तुम्हाला माणसांच्या काही विशेष सवयींबद्दल उलगडून सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि त्यातील मला दिसून आलेल्या त्रुटींबद्दल जाणीव करून देणार आहे. तर विचारपूर्वक वाचा आणि प्रतिक्रिया कळवा.
मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या लहानपणी केलेल्या काही गोष्टींचा संदर्भ देतो. बघा ना आपण लहानपणी मनगटांवर काळे धागे, तांब्याची साखळी बांधणे, गळ्यात काळा धागा घालणे, बोटांमध्ये तांब्याची अंगठी घालणे, अशा काही अल्लड गोष्टी करायचो आणि मिरवायचो. कधी नकळत, जत्रेत वा बाजारात उपलब्ध म्हणून तर कधी फॅशन म्हणून करायचो. लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी चालून जायच्या भले त्या आपल्याला शोभेसे नसले तरी आणि पालकहि फारसे काही बोलत नव्हते कारण त्यामागे काही कारणं हि दडली होती. काळा धागा हा नजरसुरक्षा म्हणून ओळखला जातो तर तांबे वापरणे आरोग्यास हितकारक. पण लहानपणी ह्या गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या आणि आपण फॅशन वा अन्य कारणांनी करत होतो. पण या गोष्टी करतांना कोणताही वाईट हेतू नव्हता तर ती त्या वयाची मानसिकता होती, निरागसता होती आणि कोणताही हेतू लपलेला नव्हता म्हणून त्याकडे पालक दुर्लक्ष करायचे. वयाबरोबर या गोष्टींमध्ये बदल होतो हे जरी खरे असले तरी हे कितपत खरे आहे हे तुम्ही पुढील स्पष्टीकरणावरून ठरवा.
लहानपणी जे केलं ती निरागसता होती पण सध्या जे निदर्शनास येते त्याला काय म्हणावे हे तुम्हीच ठरवा आणि कळवा. चला स्पष्टच सांगतो. लहानपणी जसे फॅशन म्हणून धागेदोरे वा साखळ्या घालणे प्रकार चालायचे तसे काहीसे मोठ्या माणसांकडून सर्रास होताना दिसते. उदा. मनगटाला धागेदोरे बांधणे, कपाळावर मोठा टिळा लावून मिरवणे, फॅशन म्हणून कानात बिगबाळी, देव-दर्शन किंवा तीर्थक्षेत्राला एक सहल म्हणून फेरफटका, कौटुंबिक सोहळ्यांचे सार्वजनिक प्रदर्शन, आणि बरेच काही. हि उदाहरणे प्रत्येकासाठी नसतीलही पण आपल्यातले बरेच लोक करतात. हि उदाहरणे देण्यामागचा हेतू एवढाच आहे कि लहानपणी ज्या गोष्टी अनावधानाने करीत होतो त्याच किंवा त्याहीपेक्षा अधिक गोष्टी आपण सध्या जाणीवपूर्वक करत आहोत आणि त्याबद्दल आपल्याला काहीच चुकीचे वाटत नाही. गम्मत बघा, कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलो कि तिथून आपण एक धागा बांधून घेतो जरी आधीपासूनच एक धागा असला तरी, आणि मिरवत सांगतो त्या देवाचे नाव घेऊन. धागा असतानाही अजून एक धागा बांधणे ह्यात काय अर्थ आहे. पण नाही, तीर्थक्षेत्राला जाऊन आल्याचा पुरावा म्हणून आणि एक फॅशन म्हणून. असो. आताच्या संगणक आणि इंटरनेट युगातील खोचक उदाहरण देतो ते म्हणजे सोशल मीडिया मध्ये प्रसिद्धी मिळवणे. हो मी तरी याला प्रसिद्धीचं म्हणेन, कारण बघा ना वर्षभर ह्या धकाधकीच्या जीवनात ज्यांना आपल्या आपल्या आई-वडिलांकडे बघायला व बोलायला हि वेळ नसतो किंवा ज्यांना त्यांच्या बद्दल काहीच आदर नसतो ते लोक हि मदर्स डे, फादर्स डे, त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्याबरोबर फोटो काढून सोशल मीडिया वर पोस्ट करतात. बघणाऱ्याला काय वाटेल नि काय नाही पण खरंच ह्या गोष्टींची गरज आहे. ज्या आई-वडिलांनी तुमच्या साठी खस्ता खाल्ल्या असतील त्यांना वर्षातून एकदा फक्त फोटो मध्ये स्थान आणि तेही लोकांना दाखवण्यासाठी. का? आता दुसरी गम्मत बघा, आपल्यातल्या बरेच लोकांनी हे केलेही असेल. काय तर स्वतःच्या बायकोला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा, किती हे प्रेम. काही लोकांच्या घरात फारच छान असे सुविचार लावलेले असतात तेही कोणत्यातरी देवी-देवता वा संत महात्म्याच्या फोटो खाली, पण खरंच ते तसे वागत वा अनुकरण करत असतील. बऱ्याच अंशी तुम्हाला उत्तर नकारात्मक मिळेल, कारण हे असे सुविचार आपल्याला कुठल्याही देवळाबाहेर उपलब्ध होतात आणि आपण एक आठवण म्हणून घरी आणतो व भिंतीवर लावतो. नंतर त्याकडे बघायला हि कोणाला वेळ नसतो, तर ते वाचणे दूरची गोष्ट.
टेलिव्हिजन प्रसार माध्यमांवरील मालिका, हे एक उदाहरण घ्या. सध्या झी मराठी या मराठी वाहिनीवरील चालू असलेली मालिका “देव-माणूस”, बरीच लोकप्रिय आणि सगळे पाहात असतीलच, नसतील तर रोज रात्री १०:३० ला पाहू शकता. सवय लावून घेऊ नका, मी आपले उदाहरण म्हणून बोललो. तर या मालिकेमध्ये एक बोगस डॉक्टर ज्याला एकदा कोणी चुकून देव-माणूस म्हंटलं म्हणून तो स्वतःला देवमाणूस म्हणवून घेत बऱ्याच लोकांना फसवतोय व गुन्हे करतोय. मुद्दा काय तर दिखावा जरी केला तरी तो काही डॉक्टर होणार नाही का देवमाणूस, कारण तो मुळात डॉक्टर नाही. आणि जो खरंच डॉक्टर असेल तो असे वागू शकत नाही.
अशी अनेक उदाहरणे आहेत परंतु मूळ मुद्दा आणि सांगायचा उद्देश्य हा आहे कि कोणत्याही गोष्टी दिखाव्यासाठी करू नका तर त्यामागचा हेतू जाणून घेऊन त्याप्रमाणे वागा, अनुकरण करा व सर्वांपुढे एक आदर्श ठेवा. लहानपणी केलेल्या गोष्टींना दुर्लक्षित केले जाऊ शकते पण मोठेपणी केलेल्या जाणीवपूर्वक चुकांना नाही. तुम्ही चांगले असण्याचा दिखावा किंवा कांगावा केल्याने तुम्ही चांगले होत नाही तर ते तुमच्या विचारांतून, चालण्या-बोलण्यातून आणि कर्तृत्वावरून सिद्ध होते. मोठेपणा दाखवू नका तर तो कमावण्याची धमक ठेवा आणि करून दाखवा. खोटेपणा फारकाळ टिकत नाही, परंतु मोठेपणा कायम राहतो.
लेखाच्या शेवटी एक महत्वाचे उदाहरण देऊन माझे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आई-वडिलांनी जे कष्ट करून समाजात आपले जे स्थान कमावले ज्यामुळे तुमची हि ओळख आहे ती नुसती मिरवू नका वा त्याचा दुरुपयोग करू नका तर त्यांचे विचार जपा, अनुकरण करा आणि त्यांचे नाव मोठे करा.
जर हा लेख मनापासून आवडला असेल तर इतरांपर्यंत नक्कीच पोहोचावा ही विनंती.

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *