Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

आपल्या आयुष्यातील महत्वाच्या देवी-देवता

आपल्या आयुष्यातील महत्वाच्या देवी-देवता

सर्वांच्या माहितीमध्ये व बोलण्यात ३३ कोटी देवी-देवतांची चर्चा ऐकायला मिळते पण जर का आपण त्यांना त्या देवी-देवतांची नावे विचारली तर सांगता येणार नाहीत, हि सत्य परिस्थिती..हा मुद्दा वेगळ्या वळणावर जाऊ शकतो पण महत्वाचे हे आहे कि आपण कोणत्या देवी-देवतेला मानावे वा पूजावे.

ह्या जगात अनेक देवी-देवता आहेत परंतु ज्या महत्वाच्या आहेत ज्यांना कधीही दुर्लक्षित करून चालणार नाही अशा किती देवी-देवता आहेत? सर्वानी आपापल्या मनात विचार करून उत्तरे तयार ठेवा आणि पुढे दिलेल्या माहितीवर त्याला पडताळून पहा.ह्या लेखाच्या अखेरीस तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा राहील व उत्तरे देण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. चला, आतापर्यंत उत्तरे तयार झाली असतीलच.

ह्या जगात महत्वाच्या अशा तीनच देवी-देवता आहेत, त्याम्हणजे तुमचे कुलदैवत, तुमचे आई-वडील, आणि निसर्ग आपण आता ह्या तिन्ही देवी-देवतांबद्दल थोडक्यात माहिती बघू, माझ्या नजरेतून.

सर्वात प्रथम आपली पूजनीय देवता म्हणजे आपल्या कुळाची मूळ देवता, जी आपली पालनकर्ता व रक्षणकर्ता आहे. सदैव तिची कृपादृष्टी आपल्यावर असते म्हणून तिला कधीही विसरून चालणार नाही. आपले अस्तित्व हे आपल्या कुळाकडून आलेले आहे ज्यात आपले पूर्वज ते आता अस्तित्वात असलेले सगे-सोयरे व कुटुंबीय.ह्याचा अनुभव आपल्यातल्या बहुतेकांना आलाच असेल कि जेव्हाही काही आर्थिक वा कौटुंबिक समस्या येतात व आपण आपली जन्मपत्रिका ब्राह्मणांना दाखवतो तेव्हा सर्वप्रथम ते विचारतात कि तुमचे कुळाचार व्यवस्थित पार पडत आहेत का? त्यानंतर ते बाकीचे उपाय सुचवतात. मला वाटते कि एवढे स्पष्टीकरण पुरेसं आहे आणि आपण पुढच्या देवतेकडे वळू.

आई-वडील हे आपले जन्मदाता, पालनकर्ता, रक्षणकर्ता, शिक्षक, आणि बरेच काही ज्याने आपल्याला ह्या जगात सन्मानाने जगण्याची क्षमता प्राप्त करून देतात. आई हि तर देवी-देवतांनीहि पूजनीय सांगितलेली आहे. आई आपल्या जन्माआधी पासून ते जन्मापर्यंत,व जन्मल्यानंतरही आपल्या संपूर्ण आयुष्याची धुरा वाहणारी देवता आहे.आई आपल्या बाळाला ९ महिने आपल्या गर्भात वाढवते, जन्म देते व तिच्या ह्याच सहनशीलतेमुळे तिला पूजनीय स्थान आहे. आई आपल्या मुलाबाळांबद्दल नेहमीच भलं चिंतत असते, तसेच त्यांचा ह्या जगातील पहिला-वाहिला शिक्षक आहे. आईबद्दल लिहू तेवढे कमी आहे म्हणून आता पुरते घेतो.

वडील हा आपल्या आयुष्यातील तो अढळ तारा आहे जो आपल्या उज्वल भविष्यासाठी सतत जळत असतो. आपले जगातील स्थान बळकट करण्यास वडील हे महत्वाचे काम करीत असतो, पण सहसा कोणाच्याही नजरेत नसतो. पण तो जर नसला तर त्याची उणीव मात्र सगळं सांगून जाते. “वडील” ज्यांच्याबद्दल आपण जास्त काही ऐकले-वाचले नसेल पण आज मी सांगू इच्छितो कि जसा आपल्या शरीरासाठी पाठीचा कणा जसा महत्वाचा असतो तसाच आपल्या कुटुंबासाठी “वडील” हा त्यांच्या पाठीचा कणा असतो.

आता आपण तिसऱ्या महत्वाच्या देवतेकडे आहोत तो म्हणजे “निसर्ग”. “निसर्ग हा देव आहे” या वाक्याला कोणीच नाकारू शकत नाही, ज्याची कारणे लक्षात घेऊ. निसर्गाला कोणी एक चेहरा नाही. आपल्या सभोवताली जे काही आहे उदा. झाडं, पानं, फुलं, हवा, पाणी, इ. हे सर्व निसर्गाचाच भाग आहे. बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे घडणारे बदल हे त्याचे प्रमाण आहे. आपण पाहतो कि दरवर्षी पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू ठरल्या वेळेत येऊन आपली उपस्थिती दर्शवतात व दिसणारे बदल त्याची कृपादृष्टी म्हणू शकतो. आपण एक जुनी म्हण ऐकली असेलच “देवाची करणी आणि नारळात पाणी” आणि मी सांगू इच्छितो कि इथे देव म्हणजेच आपल्या सभोवतालचा निसर्ग. हे एक उदाहरण आपल्याला सगळं काही सांगून जाते. फारच थोडक्यात मी हा विषय आटोपता घेत आहे, पण निसर्गावर बोलण्यासारखे बरेच काही आहे.

आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला कोणत्या देवतांचे स्मरण, पूजन वा आदर करायचा आहे. माझ्या मते तर ह्या तिन्ही देवता सर्वप्रथम पूजनीय आहेत परंतु याचा अर्थ असा नाही होत कि तुम्ही इतर देवतांचे पूजन वा आदर करू नये.

मी अजून एका मुद्द्यावर बोलू इच्छितो ती म्हणजे “नास्तिक”. नास्तिक म्हणजे ज्यांचा देवतत्वावर विश्वास नाही वा त्यांचे अस्तित्व मानत नाही. अशा लोकांसाठी माझं एवढेच म्हणणं आहे कि देवावर विश्वास नसेल तर आमचा कोणताही आग्रह नाही परंतु आई-वडील आणि निसर्गदेवता ह्यांना तुम्ही नाकारणे म्हणजे तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाला नाकारणे असा होईल. आई-वडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला व निसर्ग हा तुमच्या आजू-बाजूला घडणाऱ्या घटनांचा कर्ता धर्ता आहे. तुम्ही निसर्गाचे सौन्दर्य तसेच प्रकोपही पाहिला असेलच जो त्याच्या विपरीत होणाऱ्या वा अन्य घटनांचा प्रभाव असू शकतो.

ध्या आपण निसर्गाच्या विपरीत काम करत आहोत व त्याचा समतोल बिघडवत आहोत, ज्याचा परिणाम म्हणजेच “ग्लोबल वॊर्मिंग” – निसर्गाचा असमतोल. आपण सर्वानी निसर्गाचा समतोल सांभाळला पाहिजे व आपापल्या परीने सहकार्य करावे.

मला तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा राहील. वरील लेख हा माझ्या वैयक्तिक मतांवर आधारित आहे व तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न ह्या ब्लॉगद्वारे करत आहे.

सर्वात शेवटी एवढंच सांगू इच्छितो कि वरील लेखाचे तुम्ही समर्थन केलेच पाहिजे असे नाही परंतु तुम्ही ह्याचं पालन करून तरी पहा आणि जीवनात घडणाऱ्या परिवर्तनाचा आस्वाद घ्या. नक्कीच फरक दिसेल.

जर हा लेख मनापासून आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचावा ही विनंती.

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *